Home /News /maharashtra /

नागपूर: संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन

नागपूर: संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन

संघविचारांशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी कधीच लपविली नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून मोठं काम केलं होतं. त्यांच्या लेखांवर महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळात जोरदार वाद झाले होते.

    नागपूर 19 डिसेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विचारक मा. गो. वैद्य  (M G Vaidya) यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. संघाचे पहिले प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागपूरच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघाचे ते बौद्धिक प्रमुखही होते. प्रचंड व्यासंग, चौफेर लिखाण असलेल्या वैद्य यांचा देशभर त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे ते दीर्घकाळ संपादक होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. गेली अनेक दशकं ते संघ विचारांचा जोरदार किल्ला लढवत होते. देशभरातल्या अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी अनेक वर्ष लिहिलेलं ‘भाष्य’ हे सदर चांगलच गाजलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार केंद्रात आल्यानंतर संघाने पहिल्यांदाच आपली बाजू मांडण्यासाठी त्यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली होती. अतिशय शांत आणि ठामपणे ते आपली बाजू मांडत असत. शेवटपर्यंत त्यांचं लेखन, वाचन सुरूच होतं. 1934मध्ये ते संघाशी जुळले गेले त्यानंतर साध्या स्वयंसेवकापासून ते संघाच्या उच्च वर्तुळापर्यंतचा त्यांचा प्रवास हा प्रेरणादायक होता. 1978मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणूनही निवडले गेले होते. नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयात ते प्राध्यपक होते.  संघविचारांशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी कधीच लपविली नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून मोठं काम केलं होतं. त्यांच्या लेखांवर महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळात जोरदार वाद झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा.गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय. लहानपणापासून त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला मिळाला होता अशी प्रतिक्रियाही गडकरी यांनी व्यक्त केली. वैद्य हे कोरोनातून बरे झाल होते, मागील दोन दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने धंतोली येथील स्पंदन हॉस्पिटल मध्ये भरती केले होते नंतर त्यांनाव्हेंटिलेटरवर वर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी दुपारी 3.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. आपण शतक पूर्ण करू असंही तो बोलून दाखवत असत. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या होत्या. रविवारी (20 डिसेंबर) सकाळी सकाळी 10 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: RSS

    पुढील बातम्या