RSS च्या भूमिकेनं वाढली फडणवीसांची डोकेदुखी, सरकार स्थापनेबद्दल दिला सल्ला!

RSS च्या भूमिकेनं वाढली फडणवीसांची डोकेदुखी, सरकार स्थापनेबद्दल दिला सल्ला!

भाजप-सेनेच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : राज्यात सरकार स्थापनेवरून भाजप-शिवसेना यांच्यातील तणाव दूर होण्याऐवजी वाढतच चालला आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापना करताना शिवसेना भाजपसोबत असायलाच हवी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा फडणवीसांना करता येणार नाही असं सरसंघचालकांनी म्हटल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

मुंबई मिररने आरएसएसच्या सूत्रांच्या माहितीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मोहन भागवत यांनी फडणवीस यांना स्पष्ठ सांगितलं की जर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवत असेल तर त्यांना सरकार स्थापन करू दे. विरोधी पक्षात बसून लोकांची सेवा करण्यास तयार रहा पण आमदारांना खरेदी करण्याच्या घोडेबाजारात पडू नका. मोहन भागवत यांनी भाजपला सल्ला देताना म्हटलं की, अशा प्रकारचं राजकारण दीर्घ काळासाठी पक्षाच्या हिताचं नाही.

शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी सोमवारी मोहन भागवत यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तेच्या वाटपातील संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती करण्यात आली होती.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं की, शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करण्याचा प्रश्नच नाही. 2014 मध्ये परिस्थिती वेगळी होती. आम्ही वेगवेगळी निवडणूक लढवली होती. यावेळी आम्ही भाजप-शिवसेना युती करून मते मागितली होती.

दरम्यान, सत्तेच्या या संघर्षात घोडाबाजारही सुरु झाला आहे. असा घोडाबाजार करणाऱ्यांचा शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात समाचार घेतला आहे. ज्यांचा भारतीय जनता पक्षाशी, हिंदुत्व वगैरे विचारधारेशी काडीचा संबंध नाही असे काही बाटगे नव्या आमदारांशी संपर्क करून थैलीची भाषा करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ही राजकीय झुंडशाही महाराष्ट्राच्या, शिवरायांच्या परंपरेस शोभणारी नाही असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा : ..तर त्या बाटग्यांना जनता सोडणार नाही, सामनाच्या अग्रलेखातून सेनेचा इशारा

निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. त्यामध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. 288 जागापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 आणि इतर पक्ष आणि अपक्षांनी 28 जागा जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 145 चा बहुमताचा आकडा भाजप-सेना युतीने गाठला. मात्र त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 7, 2019 08:45 AM IST

ताज्या बातम्या