पिंपरी चिंचवड, 6 डिसेंबर : देशभरात केंद्र सरकारविरोधात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकांना विरोध करत पंजाब, हरियाणासह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातही अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट भूमिका घेण्याचं टाळलं आहे.
'राष्ट्रीय समाज पक्ष NDA तील घटकपक्ष असल्याने मी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलणार नाही. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी चांगल्याच योजना आणल्या आहेत,' असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात भाजप वगळता प्रमुख राजकीय पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा
सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदला आता महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सक्रीय पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत घोषणा केली आहे. तसंच रात्री उशीरा शिवसेनेनंही या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं घोषित केलं आहे.