पंकजा मुंडे भाजप सोडणार का? महादेव जानकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? महादेव जानकरांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

कजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेनं वेग पकडला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर भाजपमधील नाराजी उफाळून वर आली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेनं वेग पकडला आहे. पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या एका फेसबूक पोस्टनंतर तर या चर्चेला आणखीनच उधाण आलं.

पंकजा मुंडे भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्याकडे महादेव जानकर यांच्या रासपचाही पर्याय खुला असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी याबाबत आपली प्रतक्रिया दिली आहे. जानकर यांनी पंकजा मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

'पंकजा मुंडे या काही भाजप सोडून जाणार नाहीत. एवढा मोठा पक्ष सोडून छोट्या पक्षात त्या कशाला जातील. पंकजा मुंडे यांचा शेवटचा श्वास असेपर्यंत त्या भाजप सोडू शकत नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्य त्या 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद साधतील,' असं म्हणत महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भाजप सोडण्याबाबत होत असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळतो का, हे पाहावं लागेल.

भाजपमध्ये ज्येष्ठांची नाराजी, बंडखोरी करणार?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे आधीच हे नेते राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या