बुलडाणा, अमोल गावंडे, 10 एप्रिल- रिपाइं आठवले गटाचे बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी महायुतीतील उमेदवार प्रतापराव जाधव यांना चांगलाच झटका दिला आहे. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह रिपाइंला सोडचिठ्ठी दिली आहे. एवढेच नाही तर गवई यांनी आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिगणेंना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला असून त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महायुतीतील लहान-लहान घटक पक्षांना महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन ही नाराजी व्यक्त केली होती. आता रिपाइंच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा आणि आघाडीच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. मेहकर विधासभा मतदार संघात मागासवर्गीय समाजाला आरक्षण असून गेल्या 10 वर्षांपासून तिथे मागासवर्गीय समाजाचा बनावट जातीचा प्रमाणपत्रावर प्रतापराव जाधव मागासवर्गीय नसलेल्या आणि कानाखालच्या उमेदवाराला निवडणुकीत निवडून आणतात. यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत या पुढे शिवसेनेला मदत करणार नाही, अशी थेट भूमिका घेतली आहे. तर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजासाठी काहीच न करता फक्त त्याचा वापर करून घेतात. या सर्व बाबींचा विचार करता रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई, युवाचे, महिला आघाडीच्या 11 तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष, यांनी रिपाई पक्षाचा राजीनामा दिलाय.
तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम शिरस्कार हे बुलडाणा लोकसभेत निवडून येत नाहीत, त्यांना मतदान म्हणजे शिवसेना उमेदवाराला मतदान आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा न देता त्यांनी आघाडीचे तथा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांना जाहीर पाठींबा दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत नरहरी गवई यांनी केली. तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, तसेच रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बैठक घेतली होती. आता रिपाइं आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिगणेंना पाठिंबा देत शिंगणेचा प्रचार करण्याचा निर्धार केल्यामुळे प्रतापराव जाधवांसमोर आपल्या प्रतिष्ठेसाठी आव्हान उभं राहिलंय.
VIDEO : नाशिकमध्ये उमेदवाराचा प्रताप, निवडणूक अधिकाऱ्यांना फुटला घाम!