Home /News /maharashtra /

Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022 : 'आबांचं स्वप्न पूर्ण केलं', रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया

Maharashtra Nagar Panchyat Election Result 2022 : 'आबांचं स्वप्न पूर्ण केलं', रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया

मला आज आबांची आठवण येतेय. कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचं आबांचं स्वप्न होतं. आबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.

    सांगली, 19 जानेवारी : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या गटाला 17 पैकी तब्बल 10 जागांवर यश मिळालं आहे. खरंतर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधक आणि रोहित पाटील यांच्यात प्रचंड शाब्दिक खडाजंगी बघायला मिळाली होती. त्यावेळी रोहित पाटील यांनी निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असं वक्तव्य भाषणादरम्यान केलं होतं. अखेर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. रोहित आर आर पाटील यांनी 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांची आज खूप आठवण येत असल्याचं सांगितलं. रोहित पाटलांची भावनिक प्रतिक्रिया "मी वडील हा शब्द वापरण्याऐवजी बाप हा शब्द वापरला होता. मी विरोधकांचा भाषणाचा धागा पकडत ते वाक्य बोललो होतो. पण मला आज आबांची आठवण येतेय. कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचं आबांचं स्वप्न होतं. आबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं. मी, माझं कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते आम्ही सगळे आबांना खूप मिस करतोय", अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली. (अखेर आर.आर. पाटलांच्या मुलाने करुन दाखवलं, रोहित पाटलांनी एकहाती सत्ता मिळवली) रोहित पाटलांचं विरोधकांना नगरपंचायत जिंकल्यानंतर प्रत्युत्तर "कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा निकाल हा येत्या 19 तारखेला येईल. माझा बाप काढणाऱ्यांनो तुम्हाला निकालावेळी माझ्या बापाची आठवण नक्की होईल. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्हाला सल्ले देणाऱ्यांनो तुम्ही काय कामं केली ते सांगा", असं रोहित पाटील त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर आता रोहित पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. "निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले होते. पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही", असं रोहित पाटील यांनी सांगितलं. रोहित पाटलांमध्ये आर. आर. आबांची छवी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याप्रती सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड आदर आहे. आर. आर. आबांचं अकाली निधन होणं ही काळजाला चटका लावणारी घटना आहे. आर. आर. आबांसारख्या नेत्यांची खरंतर राज्याला खूप मोठी गरज असते, अशी भावना अनेकांनी याआधी बोलून दाखवली आहे. आर. आर. आबा आज हयात जरी नसले तरी त्यांचा चिरंजीव 23 वर्षीय रोहित पाटील यांच्यामध्ये आर.आर. आबांची छवी जरुर बघायला मिळते. रोहित पाटील यांची बोलण्याची शैली देखील वडील आर.आर. पाटील यांच्यासारखीच आहे. विशेष म्हणजे रोहित पाटील यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्यात राजकारणात यशस्वी सुरुवात केली आहे. त्याचं जिवंत उदाहरण हे आजच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात दिसून आलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या