कर्जत, 12 फेब्रुवारी : माजी मंत्री राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यानंतर खंडपीठाने आमदार रोहित पवार यांच्यासह आणखी 14 उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, मतदानाच्या आदल्या दिवशी कोरेगाव या गावामध्ये आमदार रोहित पवार यांचे दोन प्रतिनिधी मतदारांना पैसे वाटत होते. मतदारांमध्ये पैशांचे वाटप करुन रोहित पवार यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. मतदारांमध्ये पैसे वाटल्यामुळे निवडणुकीच्या निकालावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रोहित पवारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काही दिवसांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी बाहेर उभे असलेले पोलीस काय करत होते अशा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. इतकंच नाही तर JNUमध्ये झालेल्या हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याची घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली होती. विद्यापीठात अचानक वाढवलेल्या फीमुळे साबरमी हॉस्टेल परिसरात गांधीजींच्या विचारांनी शांततेत काही विद्यार्थी आंदोलन करत होते. पण शांततेत सुरू असलेलं आंदोलन लोकांना आवडत नाही. त्यामुळे पोलिसांना न जुमानता 40 लोक विद्यापीठात शिरले आणि विद्यार्थ्यांना मारहाण केली. तब्बल 3 तास विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. पण तोपर्यंत पोलीस काय करत होते?' असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला होता.
अन्य बातम्या
धक्कादायक! मंदिरातून परतत असताना ‘आप’च्या ताफ्यावर गोळीबार, एकाचा मृत्यू