रोहित तू काहीही काळजी करु नकोस, यापुढे भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच

रोहित तू काहीही काळजी करु नकोस, यापुढे भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी महापोर्टल, रिक्त जागा या विषयांवर चर्चा केली

  • Share this:

मुंबई, 13 मार्च : राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी महाभरतीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महापोर्टलवर नोंदणी, ऑनलाईन भरती प्रक्रिया याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत केली.

'महापोर्टल'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीबाबत अनेक तरुणांनी विरोध दर्शविला होता. याची दखल घेत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे महाभरतीची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी केली आहे.

हे वाचा - उन्नाव पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात कुलदीप सेंगरला 10 वर्षांची शिक्षा

यासंदर्भात रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले,  ‘राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आधीच्या 'महापोर्टल'च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांची वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे या विषयावर चर्चा केली.’

यावेळी त्यांना मुख्यमंत्री म्हणाले, "रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल." यावर रोहित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - मध्य प्रदेशचा महाराष्ट्रात परिणाम, काँग्रेसने युवा नेत्याला दिली संधी

तसंच पूर्वी महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि 'एमपीएससी'च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2020 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading