कल्याण-डोंबिवली परिसरात चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

कल्याण-डोंबिवली परिसरात चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

लॉकडाऊनमध्ये चोरीचे प्रकार बंद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा खुलेआम चोऱ्या तसेच मारामाऱ्या होऊ लागल्या आहेत.

  • Share this:

कल्याण, 20 डिसेंबर : कल्याण-डोंबिवली परिसरात चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. दुकान फोडून चोरी, चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरीचे प्रकार सुरूच आहेत. लॉकडाऊनमध्ये चोरीचे प्रकार बंद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा खुलेआम चोऱ्या तसेच मारामाऱ्या होऊ लागल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीत चोरी, घरफोडी, ज्वलेर्सवर दरोडा, सोनसाखळी चोरी या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कल्याणच्या नांदीवली परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्वेलर्सच्या दुकानात दुकान फोडून चोरी झाली होती. कल्याण पूर्वेत एका वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार झाले आहे. तर डोंबिवली सुद्धा चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरीचे प्रकार आणि मारामाऱ्या वाढल्या आहेत. या सगळ्या घटना ताज्या असतानाच कल्याणच्या आडीवली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून 11 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहे.

धक्कादायक म्हणजे भरदिवसा या चोरीच्या घटना घडत आहेत. यापैकी फक्त शनिवारी (19 डिसेंबर) रात्री चार ठिकाणी चोरी झाली. त्यात एका हॉटेलचा समावेश आहे. सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त नागरीकांनी स्थानिक माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आडीवली परिसरात पोलीस चौकी झाली पाहिजे. पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. सराईत गुन्हेगारांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. चोरट्यांना अटक केली पाहिजे, अशा मागण्या सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्याकडे केल्या. या चोरीच्या घटनांनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलीस तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिसांकडून दिली गेली आहे. मात्र चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. त्यामुळे पोलीस या सर्व प्रकारवर आळा घालतात का हे पाहावे लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: December 20, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या