मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Rising India : शिवसेनेसोबत जागा वाटप कसं होणार? अमित शाह पहिल्यांदाच बोलले

Rising India : शिवसेनेसोबत जागा वाटप कसं होणार? अमित शाह पहिल्यांदाच बोलले

भाजप-शिवसेनेचा 2024 निवडणुकीचा फॉर्म्युला काय?

भाजप-शिवसेनेचा 2024 निवडणुकीचा फॉर्म्युला काय?

महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, शिवसेनेसोबतची युती तसंच जागावाटप कसं होणार? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 29 मार्च : महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप, शिवसेनेसोबतची युती तसंच जागावाटप कसं होणार? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. नेटवर्क 18 च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

'महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली गेली. काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूक हरल्यानंतर उद्धव ठाकरेंना तुम्हाला मुख्यमंत्री करतो म्हणून सांगितलं, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. पण जेव्हा जनतेमध्ये गेले तेव्हा वैचारिक मतभेद समोर यायला लागले. कारण शिवसेना कित्येक वर्ष हिंदुत्वाचं राजकारण करत होती. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारत होता', असं अमित शाह म्हणाले.

'आमदार-खासदार तिकडून पळाले ते आमच्यामुळे पळाले नाहीत. जनतेच्या दबावामुळे ते तिकडून निघाले. भाजप-शिवसेना एकत्र राहावी, असं जनतेलाच वाटत होतं. आता असली शिवसेना आमच्यासोबत आली आहे. शिवसेना आणि आम्ही एकत्र येऊन सरकार बनवलं. निवडणुका लढवू आणि निवडणुका जिंकू', असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.

'2019 ची निवडणूक स्वबळावर लढलो असतो तर बहुमत मिळालं असतं. पण शिवसेना आमची जुनी सहकारी होती, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवला', असं अमित शाह यांनी सांगितलं.

'ही खरी शिवसेना आहे त्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये विलिनिकरणाचा प्रश्नच नाही. ही खरी शिवसेना आहे, निवडणूक आयोगानेही हे सिद्ध केलं आहे. धनुष्यबाणाचं चिन्हही त्यांना देण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढतील, विलिनिकरणाचा कोणताच प्रश्न नाही आणि असा कोणताही प्रस्ताव नाही', असं अमित शाह म्हणाले.

2024 साठी भाजप-शिवसेनेमध्ये जागावाटप कसं होणार? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा जागावाटप बसून ठरवू, ही काही मोठी गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, BJP, Shivsena