औरंगाबाद, 02 फेब्रुवारी : दहावीला मार्च 1987 मध्ये जि.प. प्रशाला शिऊर व संत बहिणाबाई कन्या प्रशाला शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद या ठिकाणी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्व वर्गमित्रांसह एकत्र येऊन शाळा भरवली. विशेष म्हणजे त्या वेळेस शिकविण्यासाठी जे शिक्षक होते ते सुद्धा आज या कार्यक्रमास आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थित होते. गुरुंच्या ऋणांचा कुठेतरी निर्देश व्हावा आणि सर्व बॅचमेटस् वर्गमित्रांची पुनर्भेट व्हावी या उद्देशाने हे रि-युनियन आयोजीत करण्यात आले होते.
शिक्षकांनी ऑर्डर देताच सुरू झाले राष्ट्रगीत
वैजापूर येथील लक्ष्मी-नारायण लॉन्स येथे दिनांक 28 जानेवारी 2023 ला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अर्जुन कदम, डीवायएसपी, सीबीआय, नवी दिल्ली यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. 1987 च्या बॅचला असलेले पी.टी.शिक्षक गोरे सर यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या त्याच भारदस्त आवाजात आदेश दिला आणि राष्ट्रगीताला सुरुवात झाली. गोरे सरांच्या आवाजाने 1987 चे शाळेचे मैदान व शाळेच्या मैदानावरील रांगा सर्वांच्या डोळ्यासमोर पुन्हा आल्या आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
हेही वाचा : भरड धान्याला 'श्री अन्न' म्हणून का घोषित केले? काय होणार फायदे? पाहा Video
हयात नसलेल्यांच्या आठवणीने वातावरण भावुक
दिवंगत गुरुजनांना व बॅचमेटसना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांची आठवण सर्वांनी काढली. कार्यक्रमाला दिवंगत गुरुजन व दिवंगत बॅचमेटस् यांच्या परिवारातील सदस्यांनीही निमंत्रणावरून आपली हजेरी लावली होती. आपल्या हयात नसलेल्या सहकार्यांच्या आठवणींनी वातावरण काहीसे भावपूर्ण झाले होते. कार्यक्रमासाठी तेव्हाचे शिक्षक दांडगे सर, गोरे सर, लाळे सर, डी. आर. जाधव सर, शेळके सर, हराळे सर, बडग सर, राधाकृष्ण जाधव सर, एकबोटे सर व वाघचौरे मॅडम हे आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपस्थित होते. या सर्व गुरुजनांचा सत्कार या निमित्ताने करण्यात आला.
विद्यार्थी अन् शिक्षकांनी सांगितले अनुभव
सर्व गुरूजन व विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून आपल्या गेल्या 35 वर्षाच्या कालावधीतील रंजक अनुभव सांगितले. कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक संकेत दरकदार व तबला वादक सर्वेश्वर भुजाडे यांनी अनेक बहारदार गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. यावेळी काही बॅचमेट द्वारा विविध कलागुणदर्शन सादर करण्यात आले. यात सर्वश्री शिवाजी गायकवाड, अर्जुन कदम, प्रविण सोनटक्के, सुरेश भुजाडे, मनोज भावसार, मनोज चुडीवाल, राजु जगताप आणि सौ.शोभा भागवत यांनी विविध गीते व कविता सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18