बीड, 10 मे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्यात अजूनही ठिकठिकाणी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection)तुटवडा निर्माण झाला आहे. बीड जिल्हा रुग्णालयात (beed government medical college and hospital) पुन्हा एका रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीची घटना घडली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील न्युलेबर वार्डमधून रेमडेसीवीर इंजेक्शन चोरण्यात आले. या वार्डमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन ठेवण्यात आली होती. रात्रभर जागून पहाटेच्या नर्सची नजर चुकवून इंजेक्शनवर डल्ला मारण्यात आला आहे.
रुग्णाला देताना एक इंजेक्शन कमी पडत असल्याने परिचारिकेच्या लक्षात येताच वरिष्ठांना कळवून तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी रहमान खान लिखायत खान(वय 30) या चोरट्यांला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक इंजेक्शन आणि काही रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात रेमडेसीवीर इंजेक्शन विकणारी टोळी सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. याआधी सुद्धा रेमडेसीवीर इंजेक्शन चोरीची घटना घडली होती. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसह मृत्यू दर देखील वाढला आहे, मृत्यू दर रोखण्यात आरोग्य विभाग व प्रशासनाला अपयश येत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आरोग्य विभाग चक्क मृत्यूचा आकडा लपवत असल्याचे उघड झाले आहे. बीड व अंबाजोगाईत केवळ एप्रिल महिन्यात तब्बल 378 बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. तर, आरोग्य विभागात याच महिन्यात 273 मृत्यूंची नोंद आहे. यामध्ये 105 कोरोना बळींचा आकड्यामध्ये तफावत दिसून आली आहे.
कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे. या सर्व मृत्यूंची नोंद तत्काळ आयसीएमआरच्या पोर्टलवर होणे अपेक्षित असते. पण ती होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे एप्रिल महिन्यात बीडमधील भगवानबाबा स्मशानभूमीत 114 तर अंबाजोगाईतील स्मशानभूमीत 264 बाधितांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद नगरपालिकेत आहे. तर, दुसऱ्या बाजूला याच महिन्यात आरोग्य विभागाकडे 273 मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यामुळे 105 मृत्यू लपविल्याचे उघड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मृतांचा आकडा हा अपडेट करण्यात आला. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकृष्ण पवार यांच्याशी विचारणा केली असता काही वेळेस पोर्टलवर अपलोड करत असताना उशीर होतो. त्यामुळे कदाचित ही तफावत आढळून येत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र जर यात काही वेगळा प्रकार असेल तर त्या संदर्भात चौकशी केली जाईल असं देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.