कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या पुण्यात तरुण सरसावले, गरजूंसांठी 'रिलीफ पुणे' मोहिम सुरू

कोरोनाचं हॉटस्पॉट झालेल्या पुण्यात तरुण सरसावले, गरजूंसांठी 'रिलीफ पुणे' मोहिम सुरू

लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना हे तरूण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आधार देत आहेत.

  • Share this:

पुणे, 25 एप्रिल : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुण्यातही वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच स्थिती लक्षात घेत पुण्यातील डॉक्टर आणि इंजिनिअर तरूण मदतीसाठी पुढे आले आहेत. लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना हे तरूण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आधार देत आहेत.

तरुणांच्या या गटाने पुणे-पिंपरी-चिंचवडमधील कोरोना मदतकार्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करत 'रिलीफ पुणे' (https://reliefpune.in/) नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येथे 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गरजूंपर्यंत पोहचून मदतकार्य करणारे, देणगीदार, गरजू लोक आणि अडचणीत सापडलेले सर्वसामान्य लोक या सर्वांसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. मदतीचा गुणाकार होण्यासाठी या सर्वांना एकमेकांशी जोडणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश असल्याचं मत या इंजिनिअर आणि डॉक्टर तरुणांनी व्यक्त केलं आहे.

"लॉकडाऊनच्या काळात घरकाम करणारे, रोजंदारीवरचे मजूर, स्थलांतरित मजूर, बेघर, कचरावेचक, सेक्स वर्कर्स, तृतीयपंथी यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसलेले विद्यार्थी, खानावळीत जेवणारे नोकरदार यांचा अगदी जेवणासाठीही संघर्ष सुरु आहे. ज्येष्ठ नागरिक किराणा आणि औषधे मिळणे कठीण होत आहे. कोरोनाशी संबंध नसलेले इतर आजार असणारे रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना दवाखान्यापर्यंत पोचणे कठीण व असुरक्षित झाले आहे. लॉकडाऊनमध्ये घरी अडकलेले अनेकजण निराश होत आहेत, त्यांना समुपदेशनाची गरज आहे. आघाडीवर ही लढाई लढणारे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी, कचरावेचक यांना पीपीईची गरज आहे. एकूणच आपण कधीही कल्पना केली नसेल अशा परिस्थितीत येऊन आपण पोहचलो आहोत," असं म्हणत या तरुणांनी कोरोनामुळे ओढावलेल्या गंभीर परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

कशी झाली 'रिलीफ पुणे'ची स्थापना?

"अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यास शासन-प्रशासन, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, डॉक्टर-केमिस्ट-मेकॅनिक यांच्या संघटना, हॉटेल मालक, किराणा दुकानदार, शेतकरी गट, सर्वसामान्य व्यक्ती आपापल्या परीने उतरले आहेत. ज्यांना प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहचून मदत करणे शक्य नाही. ते वैयक्तिक व संस्थात्मक देणगीदार मोकळ्या हाताने देणग्या देत आहेत. याच देणगीला गरजूंपर्यंत पोहचवणे महत्त्वाचे होते म्हणूनच या सर्व मदतकार्यासाठी सामूहिक आणि पारदर्शक मंच म्हणून रिलीफ पुणेची स्थापना करण्यात आली," अशी माहिती रिलीफ पुणे संस्थेने दिली.

रिलीफ पुणे या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये

1. पुणे-पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या भागातील 200 हून अधिक मदतकार्यांची माहिती व संपर्क क्रमांक

2. किराणा, जेवण, आसरा, साबण-सॅनिटायझर, पीपीई, घरपोच सेवा, वाहनसेवा, आरोग्यसेवा, हेल्पलाईन इ. विविध मदतकार्यांचा समावेश

3. रोजंदारीवरचे कामगार, स्थलांतरित, बेघर, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, कचरावेचक, तृतीयपंथी, सेक्स वर्कर्स यांच्यासाठीच्या मदतकार्यांचा समावेश

4. शहरातील भाग, मदतीचे स्वरुप, मदत दिलेला समुदाय यानुसार मदतकार्य शोधण्याची सोय

5. देणगी देऊ इच्छिणाऱ्या लोकांची यादी

6. लोकांचा प्लॅटफॉर्म: या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांना त्यांच्या माहितीतल्या मदतकार्याची भर घालता येईल. तसेच स्वतःला देणगी द्यायची असेल तर त्याचीही नोंद करता येईल.

7. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्लॅटफॉर्म उपलब्ध

8. वापरायला पूर्णपणे मोफत प्लॅटफॉर्म. आम्ही देणगी स्वीकारत नाही.

9. कोणत्याही स्मार्टफोन/कॉम्प्युटरवर संकेतस्थळ (https://reliefpune.in/) सहजपणे उपलब्ध.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: April 25, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या