रेखा जरेंची हत्या करण्यामागे बाळ बोठेला होती ही भीती, अटकेनंतर पोलिसांचा खुलासा
रेखा जरेंची हत्या करण्यामागे बाळ बोठेला होती ही भीती, अटकेनंतर पोलिसांचा खुलासा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case)यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणात पाच जणांना अटक केली होती, पण मुख्य सूत्रधार फरार होता. मात्र आता त्याच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश मिळालं आहे
अहमदनगर, 13 मार्च: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case)यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे तेव्हापासून फरार होता. अखेर हैदराबादमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी बोठेसह जनार्दन अटकुलेला अटक करण्यात आली आहे, अटकुलेने अनेक गुन्हेगारांना आसरा दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तसाच सहारा त्याने बोठे यांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील (Manoj Patil) यांच्या पथकाने बोठेला अटक करण्याची धडक कारवाई केली आहे. यासंबंधी पाटील यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना ही सर्व सविस्तर माहिती दिली. याआधी बोटेचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नाकारला होता.
अधिक्षक मनोज पाटील यांनी अशी माहिती दिली की, या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी अनेक महाराष्ट्रातील विविध पोलिसांनी मदत केली. मुंबई पोलीस आयुक्तांचेही त्यांनी आभार मानले. हैदराबाद पोलिसांनीही विशेष सहकार्य केल्याची माहिती त्यांनी दिली. पाच दिवस पाटील यांची टीम हैदराबादमध्ये बोठेचा शोध घेत होती. आज सकाळी त्यांची टीम महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. एकूण सहा टीम हैदराबादमध्ये तळ ठोकून होत्या. आज सकाळी सहा वाजता पोलिसांनी धडक कारवाई करत बोठेला अटक केली.
(हे वाचा-रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक)का केली जरेंची हत्या?
मनोज पाटील यांनी अशी माहिती दिली आहे की, चार्जशीटमध्ये म्हटल्यानुसार बदनामीच्या भीतीतून हत्या केल्याचा संशय आहेत. जरे तक्रार दाखल करतील, गुन्हा दाखल करतील अशी भीती बाळ बोठेला होती. अशी भीती बोठेला का होती, याबाबत पोलिसांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधिक्षक म्हणाले.
बोटेचा अटकपूर्व जामीन फेटाळला
बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला. त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. शिवाय बोठेचा स्टॅंडिंग वॉरंट विरोधातील अर्ज पारनेरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय.
(हे वाचा-लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते!)अशी झाली होती हत्या
रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी एका आरोपीचा पोटो जरे यांच्या मुलाने काढला होता.
जरेंच्या मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक
अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. दरम्यान रुणाल जरे यांनी बाळ बोठे यांना राजकीय किंवा शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप रुणाल जरेने केला होता.
राज्याच्या बाहेर अटक
मिळालेल्या माहितीनुसार बाळ बोठे याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. मात्र याबाबतची अद्याप तरी अहमदनगर पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कायदेशीररित्या फरार घोषित
जरे यांच्या हत्येला साडेतीन महिने होऊन गेले तरीही बोठेचा ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोऱ्हाडे यांनी हा अर्ज मंजूर केल्यानंतक बोठेला फरार घोषित करण्यात आले.
पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या प्रकरणात पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी 1500 पानांचे आरोपपत्र (दोषारोपपत्र) पारनेर न्यायालयात सादर केले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात त्याला अटक करण्यात आल्यानंतर स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याचे अजित पाटील यांनी सांगितले. रेखा जरे हत्येप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले ज्ञानेश्वर ऊर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रूक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.