ग्रहण काळात आंघोळ करावी लागते, पाणी पुरवठा नियमित करा; भाजप महिला नेत्याची अजब मागणी

ग्रहण काळात आंघोळ करावी लागते, पाणी पुरवठा नियमित करा; भाजप महिला नेत्याची अजब मागणी

पुणे महापालिकेनं गुरूवार दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद राहणार असल्याचं आधीच जाहीर केले आहे

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 25 डिसेंबर : उद्या 26 डिसेंबरला जगभरात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. ग्रहण काळात अनेक अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील भाजपच्या महिला नगरसेविकेनं तर एक अजब मागणी केली आहे.

पुण्यातील कोथरुड भागातील भाजपच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी एक अजबच मागणी केली आहे. गुरुवारी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा नियमित सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली आहे.

विशेष म्हणजे बुधवारची अमावस्या आणि गुरुवारी असलेलं सूर्यग्रहण संपल्यावर लोकांना आंघोळीसाठी पाणी लागेल असं खर्डेकर यांचं म्हणणं आहे.

पुणे महापालिकेनं गुरूवार दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद राहणार असल्याचं आधीच जाहीर केले आहे.

त्यामुळे खर्डेकर यांनी महापौरांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्या म्हणाल्या की, "२५ डिसेंबर रोजी दर्श अमावस्या असून दिनांक २६ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे. हिंदु धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार असल्यानं गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी अशी आग्रही विनंती करत आहे."

परंतु, महापौरांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तर अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या अजब मागणीची पुण्यात जोरदार चर्चा आहे.

10 वर्षांनी महाराष्ट्रात दिसणार 'कंकणाकृती सूर्यग्रहण'!

आकाश आणि खगोलप्रेमींसाठी ग्रहण ही अभ्यासासाठी एक सुवर्ण संधी असते. ग्रहण कसे आणि केव्हा दिसते, याबाबात आपल्या सर्वांना पुसटशी माहिती असतेच, कारण परीक्षेसाठी याचा अभ्यास आपण नक्कीच केला आहे. अशीच संधी दहा वर्षांनी भारतातील खगोलप्रेमींना मिळणार आहे. येत्या 26 डिसेंबरला सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

याआधी 22 जुलै 2009 रोजी मध्य आणि उत्तर भारतातून खग्रास सूर्यग्रहण, तर 15 जानेवारी 2010 रोजी देशाच्या कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. यावर्षी आलेल्या या कंकणाकृती सूर्यग्रहणाबाबतची खास गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या 12 तासआधी शुभ काळ सुरू होणार आहे.

कोणत्या भागात दिसणार सूर्यग्रहण?

यावर्षी भारतात कर्नाटकतील काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण सूर्योदयानंतर पाहता येणार आहे. तर, उर्वरित देशभरात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. दक्षिण भारतात कन्ननूर, कोईम्बतूर, कोझीकोडे, मदुराई, मेंगलोर, उटी, तिरुमलापल्ली आदी भागात हे ग्रहण कंकणाकृती स्वरुपात दिसेल. भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.

या वेळी दिसणार ग्रहण

अहमदाबाद: 8:06-10:52 (सकाळी)

नवी दिल्ली: 8.30-11.32 (सकाळी)

बंगळुरू: 8:06-11:11 (सकाळी)

हैदराबाद: 8:08-11:10 (सकाळी)

चेन्नई: 8:08-11:19 (सकाळी)

कोलकाता: 8:27-11:32 (सकाळी)

गुवाहटी: 8:39-11:36 (सकाळी)

शिलॉंग: 8:39-11:37 (सकाळी)

कोशिमा: 8:45-11:44(सकाळी)

कधी दिसतं सूर्यग्रहण?

जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात. सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते.

सूर्यग्रहण सुरक्षितपणे कसे पाहावे?

कंकणाकृती सूर्यग्रहण हे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. त्यामुळं सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा. सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून ग्रहण उघड्या डोळयांनी पाहू नये. यासाठी बाजारात मायलर फिल्मपासून तयार करण्यात आलेले चष्मे वापरावे. यांची किंमत रुपये 200पासून असते. सध्या बाजारात काही बनावटही चष्मे मिळतात. त्यामुळं नीट तपासून हे चष्मे खरेदी करावेत. त्याचबरोबर घरात जर वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी काच असेल तर या काचेचा वापर करूनही तुम्ही कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकता.

काय असतात ग्रहणाबाबत अंधश्रद्धा?

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. त्याचबरोबर ग्रहणात मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवण्यात येतात. एवढेच ग्रहण पाहायचे नाही, जेवायचे नाही अशाही काही अंधश्रद्धा आहेत. मात्र, हा नैसर्गिक आविष्कार असल्यामुळं या अंधश्रध्दांवर विश्वास न ठेवता, या विलोभनीय खेळाचा आनंद घ्या.

Published by: sachin Salve
First published: December 25, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading