रावसाहेब दानवे 'मातोश्री'वर बैठकीला गैरहजर

रावसाहेब दानवे 'मातोश्री'वर बैठकीला गैरहजर

  • Share this:

मुंबई, 06 जून : भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'मातोश्री'वर जाणं टाळलंय.

मागील वर्षी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 18 जून 2017 रोजी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सोबत होते.

पण, रावसाहेब दानवे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना 'साल्या'  शब्दाचा प्रयोग केला होता. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरात दानवेंच्या विरोधात संताप व्यक्त होत होता. त्यांच्या या वक्तव्याचं अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या या भेटीवर पडसाद उमटले. या बैठकीतून दानवेंना वगळण्यात आलं होतं. त्यांना बाहेरच बसावं लागलं होतं.

आज अमित शहांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा दिवसभर सोबत होते. पण, मातोश्रीवर जाण्याआधीच दानवेंनी काढता पाय घेतला आणि 'मातोश्री'वर जाणं टाळलं.

अशीही माहिती मिळतेय की, शिवसेनेचे मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. याबद्दलची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे केलीये.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 'मातोश्री'वर प्रवेश देऊ नये यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना मातोश्रीवर प्रवेश नाकारला. त्यामुळेच रावसाहेब दानवे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत 'मातोश्री'वर आले नाहीत.

First published: June 6, 2018, 8:28 PM IST

ताज्या बातम्या