जालना, 27 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनीही राऊत यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. तसंच, 'एकमेकांच्याच पायात-पाय अडकून सरकार पडल्यास भाजपला दोष देऊ नये', असा टोलाही दानवेंनी लगावला.
'दोन-तीन दिवसांपूर्वी संजय राऊत यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती. मी आणि संजय राऊत हे एकमेकांच्या शेजारी राहतो. त्यांनी चहा पिण्यासाठी निमंत्रण दिले आणि आम्ही दोघांनी सोबत चहा घेतला होता. अशीच काल दोन राजकीय नेत्यांची भेट झाली. या भेटीमध्ये एकत्र बसता, चर्चा करता. पण, अशा भेटीतून फार राजकीय चर्चा होत नसते, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
एकमेकांच्याच पायात-पाय अडकून सरकार पडल्यास भाजपला दोष देऊ नका - रावसाहेब दानवे pic.twitter.com/F5oI12Js6w
तसंच, ' महाविकास आघाडी सरकार पडावे, असा कोणताही प्रयत्न भाजप करत नाही. पण, जर एकमेकांच्या पायात पाय पाडून जर सरकार पडत असेल तर त्याला भाजपला दोष देऊ नका, आम्ही सक्षम विरोध पक्षनेता म्हणून काम करत आहोत. आम्ही असा कोणताही खटाटोप करत नाही, असंही दानवे यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कोणताही खटाटोप आमचा सुरू नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत आहोत. अशा राजकीय भेटीगाठी होत असतात. आमचे काही राजकीय मतभेद असतील, तरी आमच्यामध्ये काही राजकीय वैमन्यस्य नाही, असं सूचक विधानही दानवेंनी केले.
'हे तीन पक्षाचे सरकार आहे. आमच्या सरकारने ज्या काही चांगल्या योजना राबवल्या आहे. त्याची अंमलबजावणी करावी, त्यामध्ये जास्तीचा निधी उपलब्ध करावा. राज्याच्या हितासाठी चांगले काम करावे, असा सल्लाही दानवेंनी दिला.
राष्ट्रवादीने सेनेला करून दिली आठवण
दरम्यान, राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकार हे एकटी शिवसेना चालवत नाही, अशी आठवण करून दिली आहे.
'संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे', अशी आठवणच राष्ट्रवादीचे नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली.
तसंच, 'संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये समन्यवाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही, असंही माजिद मेमन यांनी स्पष्ट केले.
म्हणून फडणवीस यांची घेतली भेट - संजय राऊत
त्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यासोबत भेटीबद्दल खुलासा केला आहे. 'देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.