रत्नागिरी, 7 डिसेंबर : राज्यात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या खेडच्या लोटे एमआयडीसीमधील (Lote MIDC) रासायनिक कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे (Pollution) आता एमआयडीसी परिसरातील 3 गावांवर आता स्थलांतराची (Migration) वेळ आली आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोत दूषित झाल्यामुळे सध्या महिन्यातून एक ते दोन वेळाच या गावांना पाणीपुरवठा (Water Supply) होत आहे. प्रदूषणाचा फटका पिण्याच्या पाण्याला बसल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेकडो हेक्टर आंबा-काजूच्या झाडांना फळेच येत नसल्याने हवालदिल झालेले गावकरी आता गाव सोडून शहरात स्थलांतरित होताना दिसत आहेत.
लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी साईटीपी म्हणजेच सामूहिक सांडपाणी प्रकल्पात सोडले जाते. तिथे त्याच्यावर प्रक्रिया करुन नंतर ते एका पाईपलाईनद्वारे खोल खाडीत सोडले जाते. मात्र अनेक रासायनिक कंपन्या नियमाप्रमाणे न वागता थेट लोटे एमआयडीसी परिसरातून वाहणाऱ्या ओढे आणि नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे, मंत्र्यांकडे वारंवार तक्रारी करुन देखील प्रदूषण काही थांबल्याचे पाहायला मिळत नाहीय. याच प्रदूषणाचा मोठा फटका एमआयडीसी परिसरातील लोटे, घाणेखुंट, कोतवली, असगणी या गावांना मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : मोठी बातमी, 15 लाखांसाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडला आरोग्य विभागाच्या
घाणेखुंट गावातील लोकांनी तर आता गाव सोडून शहराकडे आपली वाट धरली आहे. अर्धे गाव आज बंद स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे गावातील पाण्याचे सर्व स्रोत दूषित झालेत. फळबागा देखील निर्फळ झाल्यात. पाणीटंचाई आणि प्रदूषणाचा त्रास यामुळे या गावातील निम्म्याहून अधिक लोक स्थलांतरित होताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा : 'मराठा आरक्षणाच्या वेळी निष्णांत वकिलांची फौज, पण...', प्रकाश शेंडगे आक्रमक
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे एमआयडीसीमुळे परिसरातील नद्या, नाले, ओढे दूषित तर झालेच आहेत. आता त्या नद्यांमध्ये मासे आणि इतर जलचर प्राणी शोधून देखील दिसत नाहीत. निगरगठ्ठ शासकीय यंत्रणा आणि उदासीन लोकप्रतिनिधी यांच्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे. हे असेच जर सुरु राहिले तर समृद्ध आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणात पर्यावरण धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आतातरी नियम मोडून उघड्यावर रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनमाणसातून होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.