Home /News /maharashtra /

रत्नागिरीमध्ये एकाच दिवशी 2 अपघात; 1 महिला ठार, 3 जखमी

रत्नागिरीमध्ये एकाच दिवशी 2 अपघात; 1 महिला ठार, 3 जखमी

दोन वेगवेगळ्या अपघातात (Ratnagiri Accident) एक महिला ठार झाली असून एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

रत्नागिरी, 8 मार्च : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज दिवसभरात एकाच ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात (Ratnagiri Accident) एक महिला ठार झाली असून एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. खेड भरणे मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेला मोठा गतिरोधक मृत्यूचा सापळा बनल्याचं चित्र आहे. याच गतिरोधकामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला तोल जाऊन खाली पडली. ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचारासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला जंगम वय 40 राहणार शिंदी जि. सातारा ही महिला आपल्या नातेवाईकसोबत खेडमध्ये आली होती. त्यानंतर दुचाकीवरून पाठीमागे बसून खेडकडे येत असताना खेड भरणे मार्गावर 'अन्नाचा पर्या' या ठिकाणी असणाऱ्या भल्यामोठ्या गतिरोधकावरून जाताना दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या या महिलेचा तोल गेला आणि ती दुचाकीवरून खाली पडली. हेही वाचा - मॉब लिंचिंगने देश पुन्हा हादरला! तरुणाला रात्रभर मारहाण; सकाळी मृत्यू गंभीर जखमी झालेल्या या महिलेला तात्काळ खाडीपट्टा मजस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या रुग्ण वाहिकेने खेडमधील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र गंभीर जखमी असल्याने चिपळूण येथे नेत असताना वाटेतच त्या महिलेची प्रकृती अधिक खालावली. लवेल येथील घरडा हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्या आधीच त्या महिलेची प्राणज्योत मालवली. तेथील डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. अपघाताची आणखी एक घटना संध्याकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान खेड भरणे मार्गावर सकाळी अपघात झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर शिवनेरी नगर परिसरात दोन दुचाकी समोरासमोर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. अ‍ॅक्टिवा आणि होंडा या दुचाकींचा हा अपघातात झाला. त्यामध्ये अ‍ॅक्टिवा वरील एक जण गंभीर जखमी झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेला आणि समोरील होंडा दुचाकीवरील एक तरुण किरकोळ जखमी झाला. जखमींना तात्काळ बुऱ्हाण टांके यांच्या रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ratnagiri, Road accident

पुढील बातम्या