Home /News /maharashtra /

आंबोली-दोडामार्गाच्या जंगलात आढळले दुर्मिळ 'वनमानव', PHOTO आला समोर

आंबोली-दोडामार्गाच्या जंगलात आढळले दुर्मिळ 'वनमानव', PHOTO आला समोर

वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे.यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारीमधील जंगलात या लाजवंतीचा वावर असल्याचे स्पष्ट झालं होतं.

आंबोली, 22 डिसेंबर  : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. त्यातच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीत पश्चिम घाटामध्ये तर घनदाट जंगल आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हे घनदाट जंगल आढळत आणि याच भागात एका दुर्मिळ माकडाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'स्लेन्डर लोरीस' (red slender loris monkey) किंवा लाजवंती (lajwanti monkey )म्हणून या दुर्मिळ माकडाला ओळखलं जातं. स्थानिक वन्य प्रेमींना या लाजवंती माकडाचे दर्शन आंबोली दोडामार्ग या परिसरातल्या जंगलात झाले असून वन्य प्रेमींसाठी ही खुशखबर म्हणावी लागेल. लाजवंती हे माकड निशाचर असून ते अत्यंत हळुवार हालचाल करते. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखे दिसणारे हे माकड असल्यामुळे त्याला वनमानव म्हणूनही संबोधले जाते. वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. त्याचा आकार 40 सेंटीमीटरपर्यंत असतो तर वजन 200 ग्रॅमपर्यंत असतं लाजवंती या माकडे कुळातील प्राण्याचे वास्तव्य भारतासह श्रीलंकेतल्या घनदाट जंगलांमध्ये आढळते.  यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारीमधील जंगलात या लाजवंतीचा वावर असल्याचे स्पष्ट झालं होतं. दरम्यान, काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये तस्करीसाठी एका स्लेन्डर लोरीस ला आणलं गेलं होतं. मात्र, वन खाते आणि पोलीस खात्यांन तस्करांना पकडत त्या माकडाला तिलारीच्या घनदाट जंगलात सोडलं होतं. त्यामुळे जरी आता लाजवंती या माकडाचा वावर या जंगलात असल्याचे स्पष्ट झाले असले तरी वन खात्यासमोर तस्करांचं एक मोठे आव्हान असणार आहे. कारण, वनमानव म्हणून ओळख असलेल्या लाजवंती माकडाची तस्करी  होण्याची शक्यता जास्त आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य पासून दक्षिणेकडच्या बेळगाव गोवा दरम्यानच्या चोरला घाटापर्यंत ते पुढे कर्नाटकातल्या दांडेली पर्यंत घनदाट जंगल आढळते. चांदोली, गगनबावडा, दाजीपूर, आंबोली, तिलारी हा सगळा परिसर घनदाट जंगलाचा म्हणून ओळखला जातो या जंगलात वाघासह बिबट्या, हत्ती, हरीण, गवे या प्राण्यांचा वावर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पण आता लाजवंती या माकड कुळातील प्राण्याच्या वास्तव्यामुळे पश्चिम घाट पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मात्र, या जंगलाचे संवर्धन करणं आजही गरजेचे आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या