ओळखीने केला घात, गडचिरोलीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने परिचारिकेवर बलात्कार!

ओळखीने केला घात, गडचिरोलीत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने परिचारिकेवर बलात्कार!

हैदराबाद येथील बलात्कार प्रकरण देशात गाजत असताना अशीच धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) शहरात रविवारी रात्री घडली

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

गडचिरोली, 09 डिसेंबर : हैदराबाद येथील बलात्कार प्रकरण देशात गाजत असताना अशीच धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) शहरात रविवारी रात्री घडली. देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत तरुणीवर बलात्कार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेश सुरेश कांबळी (३०) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

देसाईगंज येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेली शिकाऊ परिचारिका रविवारी काम आटोपल्यानंतर ती देसाईगंज येथील बसस्थानकावर पोहचली. परंतु, बस न आल्याने तिथं तिची आरोपी राजेश कांबळीशी भेट झाली. राजेश हा ओळखीतला असल्यामुळे ती या तरुणाच्या मोटारसायकलवरून घराकडे निघाली.

आरोपी राजेशने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत शिवराजपूर फाट्यावरील शेतात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी, झालेल्या झटापटीत ती बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाला, असं समजून राजेश तिचा मोबाईल आणि अन्य साहित्य घेऊन पसार झाला.

दरम्यान, गावाकडे येणारी बस आणि अन्य वाहने येऊन गेली पण अजूनही मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी पीडितेच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, पंधरा-वीस वेळा प्रयत्न करुनही मुलीने प्रतिसाद न दिल्यानं वडिलांनी आपल्या मुलासह मोटारसायकलने देसाईगंज गाठले. जिथे ती काम करत होती त्या रुग्णालयातही विचारपूस केली. परंतु, ती बऱ्याच वेळापूर्वी रुग्णालयातून गेल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे वडिलांनी शहरात इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र, तिचा पत्ता लागला नाही.

पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर कशीबशी शेजारच्या राईस मिलमध्ये गेली. तिथे उपस्थित इसमांना तिने आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहचवली. त्यानंतर वडील आणि भाऊ यांनी राईसमिलमध्ये येऊन तिला घरी नेले. रात्री साडेअकरा वाजता देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून आरोपी राजेश कांबळीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आज पहाटेला पीडित मुलीला गडचिरोली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी आरोपी राजेश कांबळीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: Dec 9, 2019 06:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading