मुंबई, 6 मार्च : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे खोतकर यांची बंडखोरी टाळण्यासाठी रावसाहेब दानवेंकडून प्रयत्न होत आहेत.
स्वबळाचा निर्धार करणारी शिवसेना आणि पटक देंगेचा इशारा देणारी भाजपा अखेर एकत्र आली. पण असं असलं तरीही स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत तयार झालेला संघर्ष हा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे अर्जुन खोतकर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात उभे राहण्यावर ठाम आहेत.
या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या दोघांमधील दिलजमाईसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे नुकतेच रावसाहेब दानवेंना घेऊन खोतकरांच्या दर्शना बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
'जालना लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. माझं नेमकं काय म्हणणं हे मी सुभाष देशमुखांना सांगितलं आहे,' अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर खोतकरांनी दिली होती.
दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघाच्या मैदानातून मी अजून बाहेर पडलो नसल्याचे खोतकर यांनी याआधी म्हटलं होतं. तसंच याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून त्यांना भेटणार असल्याचेही खोतकरांनी म्हटले होते. त्यामुळे खोतकर जर या मतदारसंघातून उभे राहिले तर दानवेंसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण खोतकरांचा या मतदारसंघात जनसंपर्क असल्याचं बोललं जातं. त्यामुळे ते दानवेंना चांगलीच टक्कर देऊ शकतात. म्हणून त्यांना रोखण्यासाठी आता दानवेंनी प्रयत्न होताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच मंचावर आले होते. पण तिथेही अर्जुन खोतकर यांनी आपण जालना लोकसभेच्या मैदानात असल्याचे म्हटलं होते.
VIDEO : 'तुमच्यात हिंमत असेल तर...' चंद्रकांत पाटलांविरोधात अजित पवार आक्रमक