अशोक चव्हाणच राज्यातली काँग्रेस संपवायला निघालेत- नारायण राणे

अशोक चव्हाणच राज्यातली काँग्रेस संपवायला निघालेत- नारायण राणे

प्रदेश काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करताच नारायण राणे आज प्रत्युत्तर म्हणून जोरदार शक्तीप्रदर्शन करताहेत. सभेच्या बँनरवर 'साहेब तुम्ही द्याल ती दिशा...तुम्हीच आमची आशा,' असं लिहिलय.

  • Share this:

कुडाळ, 18 सप्टेंबर : 

अशोक चव्हाण हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नसून, तेच आता राज्यातली काँग्रेस संपवायला निघालेत. त्यांच्या विरोधात मी थेट सोनिया गांधींकडेही तक्रारही केली होती. तसंच मी काँग्रेस पक्षात नाराज असताना एकाही काँग्रेस नेत्याला माझी साधी विचारपूसही करावीशी वाटली नाही. असा घणाघात नारायणे राणेंनी कुडाळच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केलाय. प्रदेश काँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करताच नारायण राणे आज प्रत्युत्तर म्हणून जोरदार शक्तीप्रदर्शन करताहेत. कुडाळमध्ये राणे समर्थकांचा आज मेळावा होतोय. त्यासाठी राणे पिता-पुत्र गोव्याहून कुडाळकडे आलेत. नितेश राणेंनी हुसेन दलवाईंवर हल्लाबोल करत काँग्रेसनं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केलाय. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण हेच दलबदलू होते. असा घणाघात नितेश राणेंनी केलाय. सभा स्थानी व्यासपीठावर फक्त नारायण राणेंचं पोस्टर लावण्यात आलंय. या बॅनरवर 'साहेब तुम्ही द्याल ती दिशा...तुम्हीच आमची आशा,' असं लिहिलय. त्यामुळे या मेळाव्यात नारायण राणे आपल्या कार्यकर्त्यांना नेमकी काय दिशा देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय.

आजच्या मेळाव्यात राणे लागलीच भाजप प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता तशी कमी असली तरी काँग्रेसवर विशेषतः अशोक चव्हाणांनावर नक्कीच टीकेची झोड उठवतील यात अजिबात शंका नाही. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राणे दसऱ्याच्या मुहुर्तावर भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. अर्थात याला भाजपकडून अजून कोणीच अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाहीये. पण त्याआधीच शिवसेनेकडून राणेंना भाजपात घेऊ नये, यासाठी दबावतंत्राचा वापर होताना दिसतोय. आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीतही शिवसेनेकडून भाजपला अल्टिमेटम देण्यात आलाय.

गेल्यावेळी राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाताना त्यांच्यासोबत 9 आमदार घेऊन गेले होते. यावेळी मात्र, तशी परिस्थिती नाहीये. यावेळी त्यांच्यासोबत फक्त मुंबईतून कालिदास कोळंबकर आणि त्यांचे पूत्र नितेश राणे हे दोनच आमदार आहेत. नाही म्हणायला सिंधुदुर्ग झेडपी सदस्यांना आपल्यासोबत घेताना कोणतीही कायदेशीर अडचून येऊ नये, यासाठी राणेंनी कोकण विभागीय कार्यालयात त्यांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करून ठेवलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 06:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading