मुंबई, 20 फेब्रुवारी : 'युतीत दोन्ही पक्षांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जावं असं ठरलेलं आहे. या अटीवर युती झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी दुसरं वक्तव्य करु नये, नाही तर त्यांनी युती तोडून टाकावी,' असं म्हणत पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
'पदांचं समसमान वाटप नव्हे तर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला आहे,' असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केलं होतं. त्यानंतर आता रामदास कदम यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
'शिवसेना आणि भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असा फॉर्म्युला आहे. चंद्रकांत पाटलांना माहिती नसेल तर त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घ्यावी. अन्यथा युती तोडून टाकावी,' अशी रोखठोक भूमिका रामदास कदम यांनी मांडली आहे.
दरम्यान, नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं. गेली चार वर्ष शिवसेना भाजपवर सातत्याने तुटून पडत होती. तर यापुढे युती नाही शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र देशातली बदलती राजकीय स्थिती लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेनं सामंज्यस्याची भूमिका घेतली आणि युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं. या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप आणि शिवसेनेचे महत्त्वाचे सर्व नेते उपस्थित होते.
एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा VIDEO नक्की पाहा