सुनिल दवंगे, प्रतिनिधी
शिर्डी, 1 एप्रिल : देशाभरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 112 वर्षांची परंपरा शिर्डीतील रामनवमी उत्सवाला असल्यानं इथेही रामनवमी मोठ्या श्रद्धेनं आणि उत्साहात साजरी केली गेली. तीन दिवसीय रामनवमी उत्सवात आलेल्या भाविकांनी साई चरणी भरभरून दान केले. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान तब्बल दोन लाख भाविकांनी साई समाधीच दर्शन घेतलं. तर बाबांच्या झोळीत 4 कोटी 09 लाख रुपयांचं दान भक्तांनी केलं. यात दानपेटी, ऑनलाईन, डीडी, मनीऑर्डर आणि सोने चांदीचा समावेश आहे. तीन दिवसात सुमारे 1 लाख 90 हजार भाविकांनी प्रसादलायत भोजनाचा लाभ घेतला.
परंपरे प्रमाणे यावर्षी देखील राज्यभरातून लहान मोठ्या जवळपास 200 पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. साधारण 10 दिवसांचा पायी प्रवास करुन या पालख्या रामनवमीच्या एक दिवस आधी शिर्डीत दाखल होतात. रामनवमी उत्सवाला पायी पालख्यांची परंपरा असल्यानं हा उत्सव अतिशय श्रद्धेनं साजरा केला जातो.
साईबाबा हयात असताना बाबांच्या अनुमतीने हा उत्सव उरुस स्वरुपात प्रथम सुरु झाला होता. त्यानंतर बाबांनी श्रीराम जन्म सोहळ्याची सुरुवात केली. तेव्हा पासून आजतागायत शिर्डीत रामनवमी उत्सव साई संस्थान, भाविक आणि गावकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. या उत्सवाला 112 वर्षाची परंपरा आहे. त्यामुळे रामनवमीच्या तीन दिवसात अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते.
दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात कुस्तीचा हागामा, तमाशा बरोबर अनेक मनोरंजन आणि सांस्कृतीक कार्यक्रम पार पडतात.
दानाचा तपशील
दानापेटी- 01 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये
देणगी काउंटर - 76 लाख 18 हजार 143 रुपये
डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक / डिडी, मनी ऑर्डर - 01 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपये.
सोने - 171.150 ग्रॅम , किमंत 08 लाख 64 हजार 723
चांदी - 2713 ग्रॅम , किमंत 01 लाख 21 हजार 813
अशा प्रकारे विविध मार्गाने एकूण 04 कोटी 09 लाख 39 हजार 627 रुपये देणगी प्राप्त झाली आहे.
या व्यतिरिक्त उत्सवकाळात सशुक्ल व ऑनलाईन पासेसव्दारे 61 हजार 43 हजार 800 रुपये प्राप्त झाले आहे. उत्सव काळात 3 लाख 70 हजार बुंदी लाडू पाकीटांचे वितरण साई संस्थानकडून करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.