मुंबई, 9 मार्च : महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यात राज्यसभा निवडणुकीचे वारं वाहू लागलं आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांतून राज्यसभा खासदार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन उमेदवार निश्चित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच माजी राज्यमंत्री फौजिया खान या येत्या अकरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच दिली आहे.
दुसरीकडे, शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेत राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर राऊत यांनी सांगितले की, 'शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एक उमेदवार देईल. शिवसेना आणि काँग्रेसची अतिरिक्त मत राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिली जातील. शिवसेनेचा उमेदवार कोण याबाबत पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल.'
काँग्रेस पक्षात राज्यसभेसाठी इच्छुकांची रांग
महाराष्ट्रात राज्यसभेची केवळ एकच जागा काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेसकडून विद्यमान खासदार हुसेन दलवाई यांच्यासह रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे यांची नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेस देखील त्यांचा उमेदवार जाहीर करेल, असं सांगितलं जातं. काँग्रेस पक्षाने राज्यसभेला राष्ट्रवादीला मदत करून विधान परिषदेमध्ये पुढच्या काळामध्ये एक जागा जास्त मिळवण्याची तयारी केल्याचे समजते.
भाजपकडून कोण उतरणार मैदानात?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले हे दोन उमेदवार जवळपास निश्चत असल्याचे समजते. भाजपचा राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाच्या दिल्लीलीत नेत्यांची गाठीभेटी करत आहेत.
भाजपचा तिसराा उमेदवार म्हणून एकनाथ खडसे, अजय संचेती यांसह काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भाजपचे दिल्ली नेते याबाबत अंतिम कौल काय देतात हे पाहावे लागेल. राज्यसभेच्या एका जागेसाठी विधानसभेत 37 आमदारांच्या मतांची गरज आहे. सध्याच्या संख्याबळानुसार भाजप 2, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडी यातील इतर सर्व मतांची गोळाबेरीज करून एक जाागा जिंकण्याचे गणित सध्या दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.