मुख्यमंत्री साहेब आधी या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा 'जनआक्रोश'- राजू शेट्टी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला गुरुवारी 'महाजनादेश यात्रे'ला गुरुकुंज मोझरी (जि.अमरावती) येथून सुरुवात होत आहे. मात्र, यावरून विरोधकांनी मुख्यंमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 05:04 PM IST

मुख्यमंत्री साहेब आधी या प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा 'जनआक्रोश'- राजू शेट्टी

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)

कोल्हापूर, 1 ऑगस्ट- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला गुरुवारी 'महाजनादेश यात्रे'ला गुरुकुंज मोझरी (जि.अमरावती) येथून सुरुवात होत आहे. मात्र, यावरून विरोधकांनी मुख्यंमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना अकरा प्रश्‍न केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आधी या उत्तरे द्यावीत, अन्यथा महाजनादेश यात्रेच्या मार्गावरूनच जनआक्रोश यात्रा काढून याचा जाब विचारण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हे आहेत राजू शेट्टी यांनी केलेले अकरा प्रश्न...

1)राज्यातील बिल्डराकडून वसूल केलेल्या 10 हजार कोटींच्या ठेवी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जमा झाल्या. त्यातील तुम्ही किती पैसे तुम्ही खर्च केले? आणि त्यामधून कुणाची कल्याण झाले. अजूनही बांधकाम कामगार किड्या मुंग्यांसाारखे मरत आहेत. त्यासाठी तुमच्या सरकारने काय केले?

2) पीक विम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल मी स्वतः दीड वर्षापुर्वी पुराव्यासहित माहिती आपल्याकडे दिलेले होते. संबधित विमा कंपनी व त्या कंपनीस सहकार्य करणार्‍या कृषि व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांवर काय कारवाई केली, व असे शेतकर्‍यांचे पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली. आयआरडीए (इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेपलपमेंट अ‍ॅथोरटी) कडे किती शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या व त्याचे पुढे काय झाले, याचा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही आढावा घेतला काय?

Loading...

3) आपले विश्वासू सहकारी श्री. पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखील महाराष्ट्र कृषि मूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च मागील वर्षाच्या (सन 2016-17)तुलनेत 32 हजाराने कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे. ते ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सांगणार काय ? तसेच मंत्री मंडळातील आपले सहकारी ना. सुभाष देशमुख, ना. तानाजी सावंत, ना. पंकजाताई मुंडे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकविले असले तरीसुध्दा फारसे मनावर घेऊ नका असे ऊस उत्पादकांना सांगणार आहात का?

4) आपले सरकारमधील कर्तृत्वान कृषी खात्याने बोंड अळी पासून कापूस कसा वाचवावा याचा कानमंत्र शेतकर्‍यांना दिलेला नसला तरी बोंड अळी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी एसटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास ते पुरवण्यार्‍या कंपन्यांवर कारवाई न करता मोदी सरकारच्या आदेशावरून शेतकर्‍यांनाच तुरूंगात टाकले जाईल, कुणाची गय केली जाणार नाही असा सज्जड दम कापूस उत्पादकांना देणार आहात का?

5) तूर, हरभरा, मगू उडीद कांद्याचे अनुदान ठिबकचे अनुदान इत्यादीसाठी अनुदान मिळाले नाही, तरीही तक्रार करू नका, साल्याओ...! असे सांगणार आहात काय? तसेच कर्जमाफीच्या यादी नाव असले तरीसुध्दा थकीत कर्जापोटी बँकानी कर्जवसुली केली अथवा नवीन कर्ज दिले नाही तरीही शेतकर्‍यांनी तक्रार करू नये, कारण सरकार आता झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करत असल्याने आता कुणीही तक्रार करू नये, असे सांगणार आहात का?

(हेही वाचा... विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारांनी शिवसेनेबाबत केला मोठा गौप्यस्फोट)

6) पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखर कारखान्यांतील आर्थिक घोटाळे व सिंचन घोटाळे करणार्‍यांच्या विरोधातील गाडीभर पुरावे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यांनी काहीच कारवाई केली नाही, त्यात तुमचे सरकार आल्यास त्या सर्वांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता, त्या ऐवजी धोरणात बदल करून त्यातील बहुसंख्यांना भाजपात प्रवेश देऊन उरलेल्यांना इनकम टॅक्स व ईडी या आपल्या दोन कार्यकर्त्यांची भिती दाखवून त्यांना भेदरलेल्या अवस्थेत ठेवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. हे जनतेला पटवून सांगणार आहात काय?

7) धनगर समाजाने एस.टी. दाखला मिळावा म्हणून बारामतीला उपोषण केले होते. आपण स्वतः बारामतीला जाऊन सरकार बदलल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर सामाजाला एसटीचे दाखले देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले व आता आचारसंहिता एक महिन्यात लागणार असल्यामुळे धनगरांना एस.टी. चे सर्व लाभ व तरतूद केलेले 1000 कोटी रूपये सर्व खर्च करून दाखवू हे पटवून देणार आहात का?

8) लिंगायत धर्मातील बहुसंख्य जातींना उदा(परिट, कुंभार, गुरव, जंगम, लोहार, सुतार, माळी, कोष्टी, वाणी इ.) ओबीसीचा आदिंना लाभ मिळत असताना पाटील, देशमुख यासारख्या वतनदार लिंगायत धर्मातील लोकांना ओबीसीचे आरक्षण देणे शक्य नाही, हे माहित असताना लिंगायत समाजास ओबीसीच्या सवलती देऊ, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीस भाजपा पाठिंबा देणार नाही, असे ठासून सांगणार आहात काय?

9) महाराष्ट्रातील सुशिक्षीत बेरोजगारांवर रोजगार देण्यासाठी 35 लाख पदांची मेगाभरती करून सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार होता, पण सुशिक्षित बेरोजगारांनी अर्जच न केल्यामुळे ही मेगाभरती करता आली नाही, हे बेरोजगारांना पटवून देणार आहात का?

10) राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशासकीय कामांमध्ये आऊटसोर्सिंग द्वारे रोजदांरी (कंत्राटी) पध्दतीने नोकर्‍या दिलेल्या आहेत. त्या कंत्राटदारांना दिली जाणारी शासनाकडून रक्कम व प्रत्यक्षात हातात पडणारी रक्कम यात जमीन आस्मनाचे अतंर असले तरी तुम्हाला दिलेल्या नोकर्‍या उपकार समजा व मुकाट्याने सहन करा असे डाटा ऑपरेटर, महावितरणाचे वायरमन, ड्रायव्हर, सफाई कामगार, इत्यादींना समजावून सांगणार आहात काय?

11) गेल्या 4 वर्षापासून कृषि वीज पंपाच्या जोडण्या दिलेल्या नाहीत, तसेच महावितरण कंपनीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी शेतकर्‍यांनी विजेचा वापर न करताही त्यांच्या नावावर टाकलेली बिले दुरूस्त करून देतो असे वारंवार आश्वासन देऊनही तसेच 1 रूपया 16 पैसे युनिट विजेचे दर निश्चित करण्याचा शासन निर्णय करूनही 2 रूपये 50 पैसे पैक्षा जास्त दराने वीज बिलांची आकारणी करून शेतकर्‍यांना लुबाडण्याचे धोरण योग्यच आहे, हे शेतकर्‍यांना ठासून सांगणार आहात काय?

VIDEO: नितीन गडकरींना राष्ट्रगीतावेळी पुन्हा आली भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 1, 2019 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...