Home /News /maharashtra /

महिलांकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचे डोळे काढा, राजू शेट्टींची सरकारकडे मागणी

महिलांकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्यांचे डोळे काढा, राजू शेट्टींची सरकारकडे मागणी

हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या आणि साधू संतांच्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. गुन्हेगारांना कायद्याच्या धाक राहिलेला नाही.

    अमरावती, 05 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील जळीत प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'गुन्हेगारांना कायद्याच्या धाक राहिलेला नाही. त्यामुळे आमच्या लेकीबाई सुरक्षित राहणार नसतील तर राज्यकर्त्याला याचा जवाब विचारावा लागेल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. अमरावती इथं  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राजू शेट्टी यांनी वर्धा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. 'ज्या प्रमाणे राज्यात एकतर्फी प्रेमातून स्त्रियांचे शोषण होत आहे. हे फुले-शाहू-आंबेडकरांच्या आणि साधू संतांच्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. गुन्हेगारांना कायद्याच्या धाक राहिलेला नाही. त्यामुळे आमच्या लेकीबाई सुरक्षित राहणार नसतील तर राज्यकर्त्याला याचा जवाब विचारावा लागेल, असं राजू शेट्टी म्हणाले. तसंच, गृह खात्याने पोलिसांना कडक सूचना द्याव्या, महाराष्ट्रातील स्त्रियांकडे कुणी वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्याचे डोळे काढण्यात येईल, अशा प्रकारची कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असंही यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं. ही बाई बावळट, वर्धा जळीत प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक युवतीला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. परंतु, दुसरीकडे भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या  प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात शाब्दिक वाद पेटला आहे. एवढंच नाहीतर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर या बावळट आहेत, अशी टीकाच केली आहे. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात महिला वरील ह्या दुर्दैवी घटना घडत आहे. राज्य सरकार या घटना रोखण्यासाठी अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.  सरकारकडून केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. पीडित मुलीला सरकारकडून एकही रुपया दिला नाही. रुग्णालयात पीडित मुलीच्या आई वडिलांना रुग्णालयातून पैसे मागत आहे, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला होता. तर सरकारकडून मुलीचा खर्च होत नसेल तर भारतीय जनता पक्ष हा खर्च उचलणार असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांच्याकडून राजकारण, चाकणकर यांचा पलटवार चित्रा वाघ  यांच्या आरोपानंतर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. 'गृहमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला उपचारासाठी ४ लाखाची मदत दिली आहे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात राजकारण आणलं असल्याची टीका चाकणकर यांनी केली. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयाची डायरेक्टर डॉ.अनुप मराल यांनी सुद्धा हॉस्पिटलला चार लाख रुपयाची  मिळाल्याची कबुली दिली असून कुटुंबाकडून कोणताही पैसा घेतला जाणार नसल्याचं सांगितलं. रुपाली चाकणकर बावळट, चित्रा वाघ संतापल्या चाकणकर यांच्या प्रत्युत्तरानंतर चित्रा वाघ यांना संताप अनावर झाला. चाकणकर ही बाई बावळट आहे, तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा, असं सांगत चित्रा वाघ  यांनी जोरदार पलटवारकेला. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेला 11 वाजून चार मिनिटांपर्यंत पीडितेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर 10 मिनिटांनी पैसे जमा झालेत. या प्रकरणी दोन दिवसांपासून सरकार घोषणा करत आहे.  लाज नाही वाटत काय खोटं बोलायला. सरकारचा हा खोटारडेपणा होता, तो जनतेपुढं आणणार, असल्याचंही वाघ म्हणाल्या. विशेष म्हणजे, चित्रा वाघ या आधी राष्ट्रवादीत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतून गेल्यानंतर त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Wardha, Wardha news

    पुढील बातम्या