दूध आंदोलनावरून राजू शेट्टींचा भाजपवर घणाघात, म्हणाले...

'ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला'

'ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला'

  • Share this:
    कोल्हापूर, 1 ऑगस्ट : दूध दरवाढीवरून भाजपने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारून काढलं आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 'भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल' असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात  प्रतिलिटर 5 रुपये जमा करावे, हाच सध्याचा महत्त्वाचा तोडगा ठरणार आहे. जर राज्य सरकारने लवकरच हे पाऊल उचलले नाही, तर राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही राजू शेट्टींनी दिला. तर दुसरीकडे 'देशात दूध भुकटी पडून असताना भाजपप्रणित केंद्र सरकाने न्यूझीलंडकडून दूध भुकटी आणण्याचा निर्णय का घेतला' असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. दरम्यान, राज्यभरात भाजपचे दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  महायुतीचे नेते आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत  पांडुरंग यांच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 'महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून या सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार असून हे आपल्याच भातावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत' अशी खरमरीत टीका   सदाभाऊ खोत यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published: