मोठ्या वादंगानंतर अखेर स्वाभिमानीचं ठरलं! विधानपरिषदेसाठी राजू शेट्टींच्याच नावावर शिक्कामोर्तब

मोठ्या वादंगानंतर अखेर स्वाभिमानीचं ठरलं! विधानपरिषदेसाठी राजू शेट्टींच्याच नावावर शिक्कामोर्तब

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी राजू शेट्टी यांनी होकार कळवला. मात्र तिथूनच स्वाभिमानीत वाद सुरू झाला आणि संघटना फुटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली.

  • Share this:

मुंबई, 20 जून : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषद उमेदवारीवरून संघटनेत वादंग निर्माण झालं होतं. राजू शेट्टी यांनी स्वत: विधानपरिषदेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर काही नेते नाराज झाले होते. मात्र या वादावर आता तोडगा निघाला असून राजू शेट्टी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

'स्वाभिमानी हा एक परिवार आहे. माझ्या उमेदवारीच्या चर्चेनंतर काही नेते नाराज झाले होते. त्यामुळे संघटनेच्या कोणत्याही सदस्याच्या मनात शंका निर्माण झाली असेल तर मी ही उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र आता संघटनेत एकमत झालं असून सर्व वाद मिटला आहे,' अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोट्यातून राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राजू शेट्टी यांनीही थेट बारामतीला जावून पवारांची विनंती मान्य करत राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी होकार कळवला. मात्र तिथूनच स्वाभिमानीत वाद सुरू झाला आणि संघटना फुटणार की काय, अशी चर्चा सुरू झाली.

मात्र अखेर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि खजिनदार अनिल मादनाईक यांच्यासह शुक्रवारी रात्री ॉ प्रमुख नेत्यांची जयसिंगपूर येथे बैठक झाली. या बैठकीत घरातील भांडण घरातच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांचेच नाव विधान परिषदेसाठी सुचवण्याचं ठरलं आहे. त्यामुळे अखेर गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानीत निर्माण झालेला अंतर्गत वाद संपुष्टात आला आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: June 20, 2020, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading