विवेक कुलकर्णी, मुंबई 6 जानेवारी : राज ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत घ्यायचं नाही असा दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला आहे, शरद पवार आणि राज ठाकरे यांची रविवारची भेट ही त्यांची वयक्तिक भेट होती राजकीय नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे. या दोनही बड्या नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने हे स्पष्टिकरण दिलंय.
राज यांच्या कार्यपद्धीत परिवर्तन होत असेल तर स्वागत आहे पण त्यांच्या कार्यपद्धतीत काही फरक पडला असं अजुन दिसत नाही असं मतही मलिक यांनी व्यक्त केलं. रविवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चाही झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या स्पष्टीकरणाला महत्त्व आहे.
ईशान्य मुंबई या लोकसभा जागेसाठी राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतलं जाऊ शकतं अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत होती.
आघाडीचं जमलं
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षांकडून आघाडीसाठीची बोलणी अंतिम टप्पात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे. फक्त काही जांगाचा निर्णय होणं बाकी आहे.
राष्ट्रवादीचीही तयारी सुरू
काँग्रेससोबत आघाडीची बोलणी पूर्ण झाल्यानंतर आता राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आपल्या वाट्याच्या 24 जागांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक लवकरच बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल. आघाडीत आपल्याला मिळालेल्या कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, तसंच कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार प्रभावी ठरेल, यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनसे महाआघाडीत येणार? काय म्हणत आहेत राजकीय विश्लेषक? पाहा VIDEO