Home /News /maharashtra /

'ते फक्त टीव्हीवरच दिसतात'; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच थेट टीका

'ते फक्त टीव्हीवरच दिसतात'; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर पहिल्यांदाच थेट टीका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची यांनी त्यांच्या कारभारावर थेट टीका केली आहे.

    मुंबई, 31 जुलै : उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, पण त्या सरकारचा कारभार दिसलेला नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच थेट शब्दांत टीका केली. शिवसेना सोडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केल्याला जमाना झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या कार्यपद्धतीवर राज यांनी अनेकदा टीका केली होती. पण मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर राज यांनी थेट टीका करणं टाळलं होतं. एबीपी माझाला मुलाखतीत राज यांनी ही टीका केली. "कोरोनाच्या काळात लोकांना सरकारकडून आशा आहे. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा", असं राज म्हणाले. कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खाजगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ते नाकारू कशी शकतात? असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. सरकारकडून अपेक्षा आहेत, असं म्हणतानाच राज यांनी राजकीय टीका करण्याची ही वेळ नाही, असंही सांगितलं. "कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलूच", असं म्हणत त्यांनी विरोधी भाजपवरही निशाणा साधला. राज्यातलं महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असं राज म्हणाले. "राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाही", असं ते म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Raj Thackeray, Uddhav thackeray

    पुढील बातम्या