मुंबई, 22 मार्च : गुढी पाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधल्या जाहीर सभेला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
आज सर्व प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, बऱ्याच काळानंतर बोलतोय, अनेकांनी मला विचारलं काल आणि एवढे मोठाले स्क्रिन कशाला लावले, म्हटलं भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहे. अरे काही तरी उद्देश असेल म्हणून लावले आहे ना.
महाराष्ट्रातली दोन वर्षातील राजकीय स्थिती पाहतोय, राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण सगळंच पाहत आलो. हे सगळं राजकारण पाहत असताना वाईट वाटत होतं. ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी वेदना होत होत्या.
लहान असताना माझ्या छातीवर वाघ असायचा. लहानपणापासून राजकारण पाहत आलो, बाळासाहेबांसोबत अनुभवत आलो. अनेक्यांच्या घामातून उभी राहिलेली संघटना. माझा वाद विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांशी आहे, हे मी तेव्हा म्हणालो होतो. हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार, खड्ड्यात घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून बाहेर पडत आहे, हे मी तेव्हा बोलत होतो.
शिवसेनेतली बंडखोरी, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर राज ठाकरे टीका करणार का? याचीही उत्सुकता लागून असणार आहे. तसंच महापालिका निवडणूक आणि आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अनुषंगाने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अयोध्या दौऱ्याची घोषणा होणार?
गेल्या 7 महिन्यात बदलेलं सरकार उद्धव ठाकरेंसोबतची काँग्रेस-राष्ट्रवादीची जवळीक यावर भावावर राज ठाकरे काय बाण सोडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसेच मनसेकडून राज ठाकरे यांची हिंदूजननायक ही प्रतिमा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरे अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर येणाऱ्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप एकत्र येईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackeray