राज ठाकरेंची तोफ ठाण्यात धडाडणार, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान स्वीकारणार?
Raj Thackeray Rally: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे विरोधकांच्या आरोपांवर भाष्य करण्याची दाट शक्यता आहे.
ठाणे, 5 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात जाहीर सभा घेणार (Raj Thackeray rally in Thane) आहेत. राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच मशिदीवर भोंगे असतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल म्हटलं. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मनसे म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टीकाही झाली. याच दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंना एक आव्हानही केलं होतं. आता ठाण्यातील सभेतून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल रोजी राज ठाकरेंची ठाण्यात सभा होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात ही सभा होणार आहे. यासाठी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सभेची परवानगी आणि इतर तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा : गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामेजितेंद्र आव्हाडांचं आव्हान स्वीकारणार?
गुडीपाडव्याच्या मेळाव्यातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीवाद केल्याचा गंभीर आरोप करत टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले होते. 'मला आश्चर्य वाटतं जो माणूस एका प्रगतशील विचारांचा वाटायचा की, माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जायचं हे सांगणारे राज ठाकरे आज मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का? अधोगती आहे कळत नाही? मुंब्य्राचं नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे, या सकाळी लवकर उठून मुंब्य्राच्या एका मदरसाच्या घरात, दाढीचा वस्तरा सापडला तर मी राजकारण सोडेन, असा आव्हानच आव्हाडांनी राज ठाकरेंना दिलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिलेल्या या आव्हानावर आता राज ठाकरे ठाण्यातील सभेत काय बोलणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना हात जोडून एक विनंती केली आहे. मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असंही विधान केलं. राज ठाकरे यांनी केलेल्या या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, नाशिकमध्ये विविध ठिकाणी मनसेच्या कार्यालयांवर भोंगे लावत हनुमान चालिसा लावली. यानंतर पोलिसांनीही हे भोंगे जप्त करत कारवाई केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काल एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका. कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयेत. गॅस पेट्रोल डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.