Home /News /maharashtra /

'मराठी'साठी लेखिकेचा मुंबईत ठिय्या, राज ठाकरेंनी केलं मनसैनिकांच कौतुक!

'मराठी'साठी लेखिकेचा मुंबईत ठिय्या, राज ठाकरेंनी केलं मनसैनिकांच कौतुक!

'News18 लोकमत'नं बातमी लावून धरल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी, शेखर गव्हाणे हे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते.

मुंबई, 9 ऑक्टोबर: मराठी भाषेचा मुद्दा लावून धरलेल्या लेखिका शोभा देशपांडे यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सर्वात आधी पोहोचलेल्या मनसैनिकांचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. मुंबईतील कोलाबा परिसरात महावीर ज्वेलर्स मालकाला लेखिका शोभा देशपांडे यांची माफी मागायला भाग पाडल्याबद्दल सोबतच मराठीचा द्वेष करणाऱ्या परप्रांतीयाला चोप दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. हेही वाचा..ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची परीक्षा पुढे ढकलली 'News18 लोकमत'नं बातमी लावून धरल्यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, वरळी विभाग अध्यक्ष संतोष धुरी, शेखर गव्हाणे हे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 21 तासांनी मागितली माफी... प्रसिद्ध ज्वेलर्सकडे मराठी बोलण्याची मागणी केल्यावरून लेखिका शोभा देशपांडे यांनी तब्बल 21 तास ठिय्या आंदोलन केले. मराठी बोलण्यास सांगितल्यानंतर मुंबईतील कोलाबा परिसरात असलेल्या महावीर ज्वेलर्सच्या मालकांनी त्यांना चक्का दुकानातून बाहेर ढकललं. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला होता. त्यानंतर शोभा देशपांडे यांनी गुरुवारी दुपारपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. अखेर 21 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर ज्वेलर्स मालकानं शोभा देशपांडे यांची माफी मागितली. काय आहे प्रकरण? लेखिका शोभा देशपांडे कुलाबा येथील महावीर ज्वेलर्स येथे गेल्या होत्या. त्यावेळी दुकानदार त्यांच्याशी हिंदीतून बोलत असल्यामुळे त्यांनी मराठीतून बोलण्याची विनंती केली. मात्र, दुकानदारानं मराठीतून बोलण्यास नकार दिला. एवढंच नाही तर शोभा देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वेलर्समधील दुकानदारांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांना ढकलून दुकानाबाहेर काढले. मराठी भाषेचा केलेला अपमान सहन न झाल्यानं तब्बल 21 तास दुकानाबाहेर शोभा देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केलं. महावीर ज्वेलर्स आणि पोलीस दोघांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शोभा देशपांडे यांनी यावेळी केली. देशपांडे यांनी, पोलिसांनी त्यांना ढकलल्याचा आरोप केला. मला कोणत्या अधिकाराने हात लावला? असा सवालही त्यांनी केला आहे. शोभा यांच्या मते, त्यांना ढकलणाऱ्या महिला पोलीसही मराठी होत्या. हेही वाचा.. माझं भाषण चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं; संभाजीराजेंचा खुलासा दरम्यान या प्रकारानंतर मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनीही त्यांची भेट घेतली. अखेर शोभा देशपांडे यांच्या ठिय्याला 21 तासांची यश आले. महावीर ज्वेलर्सचे मालक यांनी शोभा देशपांडे यांची माफी मागितले. शोभा देशपांडे या मराठी लेखिका असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी लढा देत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या