औरंगाबाद, 11 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसची मोठी दहशत पसरली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. परंतु, दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, 'अजून कुणी दगावलं नाही. राज्य सरकार उगाच लोकांना पॅनिक करत आहे', असं धक्कादायक विधान केलं आहे.
नव्या वर्षात मनसेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेत नव्या जोमाने सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. मनसेकडून औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं. परंतु, कोरोना व्हायरसमुळे मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
परंतु, आज राज ठाकरे यांनी उद्या शिवजयंती साजरी होणारच असं स्पष्ट केलं आहे. सकाळी शिवरायांची पुजा करून पुढील कार्यक्रम केला जाणार आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच, राज्य प्रशासन कोरोना व्हायरसमुळे उगाच लोकांना पॅनिक करत आहे. एकही रुग्ण दगावला नाही. मग उगाच कशाला बाऊ केला जातोय, असा सवालच राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.
उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आपल्या मुलासह औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. अमित यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार होतं. परंतु, पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे.
आता उद्या सकाळी क्रांतीचौक इथं राज ठाकरे शिवपूजन करणार आहे. त्यानंतर संध्याकाळी संस्थान गणपती येथून मिरवणूक काढण्याचं नियोजन करण्यात आलं होतं.
तर दुसरीकडे औरंगाबादेत शिवसेनेची शिवजयंती रॅलीही रद्द करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, शहरभरात चौका चौकात शिवभक्त विभागून शिव पूजन करणार आहे, अशी माहिती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.