मनसे Vs भाजप संघर्ष पेटणार, जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

मनसे Vs भाजप संघर्ष पेटणार, जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक होत आहेत.

  • Share this:

जळगाव, 23 ऑगस्ट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जळगावात पोहोचल्यानंतर त्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. पण पोलिसांनी त्याआधीच या कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जळगावमधील मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे आणि इतर तीन जणांचा समावेश आहे.

मनसे विरुद्ध सरकार संघर्ष पेटणार

कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली.मात्र त्त्यानंतरही राज ठाकरे यांचा आक्रमक अंदाज कायम असल्याचं पाहायला मिळालं. कृष्णकुंजवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'अशी कितीही वेळा चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही.' राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावर मनसैनिक सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मुंबई-ठाण्यातील नेत्यांची धरपकड

राज ठाकरे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर कोणतीही गडबड होऊ नये म्हणून काल गुरुवारी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली . मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलं. तसंच मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आलं. ही कोणतीही कारवाई नसून खरबरदारी म्हणून उचललेलं पाऊल आहे, असं स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आलं होतं.

मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच 'EDiot Hitler' (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान केल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं. संदीप देशपांडे सकाळच्या सुमारास ते जॉगिंगला आले असतानाच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं होतं.

VIDEO : राज ठाकरेंचा पुन्हा आक्रमक बाणा, कार्यकर्त्यांशी बोलताना सरकारला आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या