Home /News /maharashtra /

राज ठाकरेंनी डोंबिवलीत केले 'डॅमेज कंट्रोल', जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी!

राज ठाकरेंनी डोंबिवलीत केले 'डॅमेज कंट्रोल', जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी!

आगामी कल्याण डोंबिवली निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षात होत असलेली पडझड पाहता राज ठाकरे यांनी 24 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली.

डोंबिवली, 02 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) बालेकिल्ला समजलेल्या जाणाऱ्या डोंबिवलीत (Dombivali) अचानक दोन मोठ्या नेत्यांनी साथ सोडल्यामुळे पडझड झाली. त्यामुळे थेट अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी तातडीने हस्तक्षेप करून डॅमेज कंट्रोल केले आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम (Rajesh Kadam) यांनी सोमवारी रात्री पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ मंगळवारी सकाळी माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे (Mandar Halbe) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजकडे धाव घेतली. राज ठाकरे यांच्याची चर्चा केल्यानंतर तातडीने यावर तोडगा काढण्यात आला. रिक्त झालेल्या डोंबिवली शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची निवड करण्यात आली आहे. याआधीही त्यांनी शहराध्यक्षपद भूषवले होते. अचानक पडलेल्या खिंडारामुळे थेट याची झळ कृष्णकुंजपर्यंत पोहोचली.  त्यामुळे अवघ्या 24 तासात जुन्या शिलेदाराला नवी जबाबदारी देऊन राज ठाकरे यांनी डोंबिवलीत डॅमेज कंट्रोल केले. एका वर्षभरासाठी ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राजेश कदम यांच्या जाण्यानंतर सर्वात मोठा धक्का हा मंदार हळबे यांच्या जाण्यामुळे बसला होता. कारण, मंदार हळबे हे मनसेचे गटनेते राहिले होते. एवढंच नाहीतर मनसेकडून त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. पक्षाच्या सुरुवातीपासून ते सोबत होते.  राजेश कदम हे सुद्धा पक्षाचे जुने नेते होते. त्यांनी विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं होतं. त्यामुळे राजेश कदम यांच्यासारखा नेता पक्ष सोडून गेल्याने डोंबिवलीतील कार्यकर्तेही गोंधळात पडले होते. आगामी कल्याण डोंबिवली निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षात होत असलेली पडझड पाहता राज ठाकरे यांनी 24 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Published by:sachin Salve
First published:

Tags: मनसे

पुढील बातम्या