राज ठाकरेंवर 'ते' नागरिक दाखल करणार खटला, 'मिशन बांगलादेशी' मोहिमेचं बुमरँग

राज ठाकरेंवर 'ते' नागरिक दाखल करणार खटला, 'मिशन बांगलादेशी' मोहिमेचं बुमरँग

मनसेविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं या नागरिकांनी सांगितलं आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे, 23 फेब्रुवारी : पुण्यात मनसेने पकडून दिलेल्या तीन कथित बांगलादेशी नागरिकांचं प्रकरण पोलिसांनी निकाली काढलं आहे. मात्र या प्रकरणात आता पकडून दिलेले तिन्ही नागरिक राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार आहेत. या कुटुंबाला या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं या नागरिकांनी सांगितलं आहे.

या प्रकरणात ज्यांना मनस्ताप झाला ते रोशन शेख सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. शनिवारी रोशन यांच्यासह बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी मनसेचे कार्यकर्ते पोहोचले आणि तिघांना बांगलादेशी असल्याबाबतची विचारणा केली. त्यानंतर पोलिसांना बोलवून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तिघांची कागदपत्र तपासण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनलाही नेलं.

पोलिसांनी कागदपत्र तपासल्यावर या तिन्ही व्यक्ती पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशच्या असल्याची कागदपत्रे पाहून पोलिसांची खात्री पटली त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र या प्रकरणांनंतर रोशन शेख यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. सोसायटीतल्या इतर नागरिकांकडूनही त्यांना 'तुम्ही बांगलादेशी आहात का ?'अशी विचारणा झाली. त्यांच्या मुलांनाही सोसायटीत खेळायला गेल्यानंतर इतर मुलांकडून हीच विचारणा झाली.

त्यानंतर रोशन यांच्या मुलांनी त्यांच्याकडे आपण खरंच बांगलादेशी आहोत का? अशी विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या रोशन शेख यांनी आता राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात खटला दाखल करायचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या या प्रतापामुळे रोशन शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय.

बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांचीही परिस्थिती फार वेगळी नाही. त्यामुळे मनसेच्या स्वयंघोषित देशभक्तांकडून करण्यात आलेल्या मानहानीला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या कार्यकर्त्यांना देशभक्ती आणि नागरिकत्व तपासण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल विचारत ही मानहानी सहन करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या तिघांमधील रोशन शेख हे उत्तम मराठी बोलतात. सुरुवातीच्या काळात मीदेखील मनसेचं सदस्यत्वही घेतलं होतं, असा खळबळनक दावा रोशन शेख यांनी केला आहे. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कागदपत्र जरी असले तरी या कुटुंबाचे सदस्य हे बांगलादेशी असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. ही कागदपत्र तपासण्यासाठी पोलिसांना बांगलादेशातून पुरावे गोळा करून आणावे लागत असल्यामुळे पोलीस अशा प्रकरणाचा तपास करत नाहीत, असा आरोप अजय शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, मनसेच्या या भूमिकेमुळे या तीन कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली आहे. सामान्य आयुष्य जगणाऱ्या नागरिकांच्या हेतूंवर शंका उपस्थित करणं हे राजकारण्यांसाठी सामान्य असेल, मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांची अवस्था वाईट होते. अनेक अडचणी त्यांच्या आयुष्यात उभ्या राहतात. राजकारणासाठी हे करण्याचा अधिकार कुठल्याही राजकारण्यांना नाही, असं बोललं जात आहे. त्यामुळे रोशन शेख यांच्या कायदेशीर लढाई ला मोठं महत्व प्राप्त झालं आहे.

First published: February 23, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading