Home /News /maharashtra /

मुंबईसह राज्यभरात पाऊस आला रे !

मुंबईसह राज्यभरात पाऊस आला रे !

मुंबई, 02 जून : घामांच्या धारांनी न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना वरुणराजांनी गारेगार दिलासा दिलाय. मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलीये. मुंबईत संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीये. राज्यातही मान्सूनपूर्व पावसानं  दमदार हजेरी लावलीये. मुंबईत संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला असून ढगांनी गर्दी केलीये. अनेक ठिकाणी रिमझिम सरी बरसल्यात. ऐन संध्याकाळी चाकरमानी घरी निघाले असताना वरुणराजांच्या अचानक एंट्रीमुळे चाकरमान्याची त्रेधातिरपड उडालीये. तर ठाणे जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पाऊसाला सुरूवात झालीये. ठाणे, कर्जत, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, विरार परिसरात सध्या मुसळधार पावसाला सुरूवात झालीये. अचानक आलेल्या पावसानं ठाणेकर चांगलेच सुखावले आहेत. तर नवी मुंबईतही मुसळधार पाऊस सुरू आहे. विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पावसाने हजेरी लावलीये. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी राज्यातील इतर भागातही मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावलीये. बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर शहरासह तालुक्यातील काही गावाला पावसानं चांगलंच झोडपलंय. तर औरंगाबादमध्येही मुसळधार पाऊसानं हजेरी लावलीये. त्यामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मनमाडसह येवला, सटाणा भागात देखील दमदार पाऊस झालाय. मनमाडमधील काही भागात घरांचे पतरे उडून गेल्यानं मोठ नुकसान झालंय. काही शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट कोसळल्यायत तर केळी बागायतदार शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. तर नाशिक, पुणे आणि कर्जतमध्येही आज मुसळधार पाऊस बरसला.. पावसाच्या आगमनाने वसई-विरार पसरला गारवा वसईत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने सायंकाळी साडेसातच्या सुमारास हजेरी लावली. चंदन नाका येथे विद्युत रोहीत्राचा स्फोट झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अंगाची काहिली करणाऱ्या उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. या पावसाची अगदी चातक पक्ष्याप्रमाणे वाट पहाणाऱ्या नागरिकांची हुरहूर आणखी टांगणीला न लावता शनिवारी पावसाने आपले पाय वसईत रोवले. मे महिना हा चांगलाच वाढलेल्या तापमानाचा महिना राहिल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. त्यातच यंदा मान्सूनच्या वाटेला अलनियोचा अडथळा राहणार नसल्याने पाऊस यंदा लवकर दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली होती शनिवारी वसई आणि पालघर जिल्ह्यात पाऊस पडला. वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या वसई तालुक्याच्या शहरी भागातही पावसाने आपल्या आगमनाची नांदी दिली. पावसाच्या आगमनाने शेतकरी आणि नागरिकांनमध्ये आनंद पसरला असून लवकरच शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
First published:

Tags: Mumbai rain, Rain, कर्जत, कल्याण, ठाणे, डोंबिवली, पाऊस, बदलापूर, मुंबई, विरार

पुढील बातम्या