मुंबई, 06 जानेवारी: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातारणात बदल झाला असून दिवसभर ढगाळ हवामान आहे. मागील 24 तासांत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलकासा पाऊसही पडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात 9 जानेवारीपर्यंत पावसाची स्थिती कायम असणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 6 ते 8 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यान, पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे शहरातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे थंडीच्या दिवसांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी हवामानाचा पारा घसरला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत वातावरणातला गारवा हटायला तयार नाही.
पुढील चार दिवस राज्यात पावसाचा अंदाज
मुंबईसह राज्यातील विविध भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 8 जानेवारीपर्यंत पावसाची स्थिती कायम अणाणार आहे. यादरम्यान राज्यात सर्वच ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता आहे. राज्यात अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्टयात पावसाची दाट शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Pune, Rainfall