मुंबई, 15 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. 15) उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. (Rain in Maharashtra) उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, ठळक कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सिधी, अंबिकापूर, जमशेदपूर, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.
हे ही वाचा : #कायद्याचंबोला: मुलाला दोघांचही नाव देण्याची आईवडिलांची इच्छा! रुढी-प्रथांमुळे दीड वर्षानंतरही जन्म दाखला मिळेना
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. आज (ता. 15) उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याचे संकेत
वायव्य मध्य प्रदेशात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्यकडे सरकणारी ही प्रणाली परत मागे फिरून उत्तर प्रदेशकडे जाण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर प्रदेशाकडे जाताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, जोरदार पावसाचा इशारा ( येलो अलर्ट ): मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, सातारा, कोल्हापूर. विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
हे ही वाचा : कल्याण डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक, क्रिप्टो माफियांनी हल्ला केल्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
रत्नागिरीत जिल्ह्यात 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितेता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचबरोबर काही ठिकाणी बंधारे पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Konkan, Mumbai rain, Rain in kolhapur, Weather update, Weather warnings