औरंगाबाद, 18 फेब्रुवारी : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. परंतु, समोरून येणाऱ्या धावत्या रेल्वेसमोरच कार्यकर्ते धावत सुटले होते, सुदैवाने पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने औरंगाबादेत रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. लासूर रेल्वे स्थानकाजवळ कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते हे रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात सुपर फास्ट एक्स्प्रेस आली होती. या गाडीला लासूर स्थानकावर थांबा नव्हता.
#औरंगाबाद शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रेल्वे रोको pic.twitter.com/E4QqneOvBH
— sachin salve (@SachinSalve7) February 18, 2021
समोरून भरधाव रेल्वे येत असताना सुद्धा कार्यकर्ते ट्रॅकवरून बाजूला हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी धाव घेऊन कार्यकर्त्याला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला खेचले त्यामुळे कार्यकर्ते अवघ्या काही सेंकदाने बचावले.
भरधाव रेल्वे पुढे काही अंतर जाऊन थांबली. सुदैवाने रेल्वे थांबल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
भाजपला शेतकरी आंदोलनाचा धसका
दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रबळ स्थान असलेल्या जाट क्षेत्रात नाराजी वाढत आहे. ही नाराजी दूर करण्याकरता आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील जाट बहूल क्षेत्रात वाढलेली केंद्र सरकारबद्दलची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीत बैठकींचे सत्र सुरू झालं आहे.
100 दिवसांहून अधिक काळ राजधानी दिल्लीच्या सीमा भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हा संपूर्ण प्रदेश भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठीराखा मानला जातो. केंद्रात सत्तेचे बहुमत मिळविण्याकरता या राज्यांतून मोठी रसद भारतीय जनता पक्षाला मिळत असते.
मात्र शेतकरी नेते राकेश टीकेत यांच्या भावनात्मक आवाहनानंतर संपूर्ण जाट बहूल क्षेत्रात शेतकरी महापंचायती सुरू झाल्या आहेत. यामुळे भारतीय जनता पक्षाचा पाठीराखा असलेला हा प्रदेश भाजपच्या मतपेटीच्या राजकारणातून दूर तर जाणार नाही ना, अशी चिंता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच गेल्या आठवडाभरापासून विविध बैठकीचे सत्र सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Farmer protest, Maharashtra, Video viral