रायगड, 17 नोव्हेंबर : पाली इथं 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतप्त कुटुंबियांची पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली असून दोषींवर दोन दिवसात कारवाई करा, अन्यथा कुटुंबीय आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली सुधागडातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून वेळीच उपचार व आरोग्य सुविधा न मिळाल्याने आजवर अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. रुग्णवाहिका आहे तर चालक नाही, चालक आहे तर त्यातील डॉक्टर नाही, ही परिस्थिती आजही अनेकांचा बळी घेत आहे. अश्विनी अशोक कदम (45) , मु. उद्धर, पो.खवली तालुका सुधागड या महिलेला सर्पदंश झाल्याने त्यांना तातडीने पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची वेळ आली असता याठिकाणी रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर उपलब्ध न झाल्याने महिलेला वेळीच उपचार मिळाले नाहीत. परिणामी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबीयांनी मंगळवार दि.(17)रोजी पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक दिली आणि सुधागड तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी यांची भेट घेऊन कदम यांच्या मृत्यूस ढिसाळ आरोग्य व्यवस्थापन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला.
याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली. आमच्या भगिनीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर दोन दिवसात कारवाई न झाल्यास पीडित कुटुंबीय पाली प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पाली सुधागडातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा अनेक कारणांनी रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. सर्पदंश झालेल्या महिलेला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते असे कुटुंबीयांनी म्हटले.
'माझ्या काकीला वेळेत उपचार मिळाले असते तर...'
आरोग्य व्यवस्थेचा हलगर्जीपणा व आधुनिक सोईसुविधांचा अभाव आदी कारणाने अनेक निष्पाप जीवांचा बळी जात आहे, ही पहिलीच वेळ नाही त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था जलद सुधारा अन्यथा रिपाइं व्यापक स्वरूपाचे जनआंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मयत महिलेचे नातेवाईक व रिपाइं कार्यकर्त्यांनी पाली पोलीस स्थानक व तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना तक्रारींचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
यावेळी गणेश कदम यांनी सांगितले की माझ्या काकीला वेळीच उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते, रुग्णवाहिका व डॉक्टर मिळवण्यासाठी आम्ही प्रचंड धडपड केली, मात्र वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. तसेच येथील रुग्णवाहिका चालकाचे देखील यावेळी सहकार्य मिळाले नाही, 108 रुग्णवाहिका मिळण्यात दोन तास विलंब झाला, त्यामुळे रुग्णाला वेळीच उपचार न मिळाल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला. यापुढे कुणावरही अशी वेळ येऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्था सुधारून सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी कदम यांनी केली.
येथील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा हा बळी असल्याचे सांगत दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी रिपाइं सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे यांनी केली. कारवाई न झाल्यास रिपाइं आंदोलन छेडेल असा इशाराही सोनावळे व मयत महिलेच्या कुटुंबियांनी दिला. यावेळी रिपाइं सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावळे, नरेश शिंदे, गणेश कदम, राजेश गायकवाड, सतीश गायकवाड, संदेश शिंदे, अरुण शिंदे, मिलिंद शिंदे, रितेश गायकवाड, लक्ष्मण शिंदे, प्रशांत शिंदे, आदींसह ग्रामस्त व रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धर येथील महिलेच्या मृत्यूबाबत चौकशी करून कुटुंबियांच्या मागणीच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सुधागड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितलं आहे.