'किल्ले रायगडाच्या रस्त्यावरची वृक्षतोड थांबणार का?' हिरवळ संस्थेचा सवाल

'किल्ले रायगडाच्या रस्त्यावरची वृक्षतोड थांबणार का?' हिरवळ संस्थेचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांनी जारी केलेल्या आज्ञापत्रात झाडांची जपणूक करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. हिरवळ संस्थेचे किशोर धारिया, त्यांचे कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी आज्ञापत्राचं वाचन केलं. त्याचवेळी शिवजयंतीच्या निमित्ताने पाचाडहून शिवाजी महाराजांची पालखीही आली...

  • Share this:

आरती कुलकर्णी

पाचाड(किल्ले रायगड), 20 फेब्रुवारी : शिवजयंतीच्या दिवशी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला हिरवळ प्रतिष्ठानने एक अनोखं आंदोलन केलं. या संस्थेचे कार्यकर्ते आणि रायगड रोडवरच्या गावांतल्या शाळांमधल्या मुलांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीजवळ झाडं वाचवण्याची शपथ घेतली.छत्रपती शिवाजी महाराजांनी जारी केलेल्या आज्ञापत्रात झाडांची जपणूक करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. हे आज्ञापत्र जिजाऊंच्या समाधीजवळ लावण्यात आलंय. हिरवळ संस्थेचे किशोर धारिया, त्यांचे कार्यकर्ते आणि या मुलांनी आज्ञापत्राचं वाचन केलं. त्याचवेळी शिवजयंतीच्या निमित्ताने पाचाडहून आलेली शिवाजी महाराजांची पालखीही आली. 'जय भवानी, जय शिवाजी' असा गजर करत या मुलांनी शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि हा जथ्था पुढे निघाला...

रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड

किल्ले रायगडाला पूर्वीसारखं वैभव प्राप्त करून देण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. त्याचाच एक भाग म्हणून किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणासाठी ही वृक्षतोड होतेय.

मुंबई-गोवा हायवेपासून किल्ले रायगडाचा रस्ता सुमारे 23 किलोमीटरचा आहे. याच रस्त्यावर नातेखिंडीच्या जवळ झाडांची कत्तल करण्यात आलीय. हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया रायगड रस्त्यावरची ही झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतायत.

शिवजयंतीच्या दिवशी सगळी शाळकरी मुलं, गावकरी, 'हिरवळ' चे कार्यकर्ते या सगळ्यांनी रायगड रस्त्यावरच्या झाडांना शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र लावलं आणि झाडांच्या रक्षणासाठी भगवं बंधनही बांधलं. रायगड रस्त्याच्या सुरुवातीच्या भागात वृक्षतोडीला सुरुवात झालीय पण गावकरी आणि मुलांच्या मागणीचा विचार करून पुढची झाडं तोडणं तरी थांबवावं, अशी हिरवळ संस्थेची मागणी आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण झाडांची अनावश्यक कत्तल थांबवा, असं किशोर धारिया म्हणतात.

(हेही वाचा : बारामतीच्या पाण्यावरून शरद पवारांचे जशास तसे उत्तर, भाजप नेत्यांचा तिळपापड)

371 झाडं तोडण्याची परवानगी

रायगड रस्त्याच्या रुंदीकरणाचा हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. वनखात्याने पहिल्या टप्प्यात 371 झाडं तोडण्याची परवानगी दिलीय पण रायगडच्या पूर्ण रस्त्याचं रुंदीकरण करायचं झालं तर सुमारे 4 हजार झाडं तोडली जातील, अशी भीती किशोर धारिया यांना वाटतेय. याबद्दल त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिलं आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी पत्र लिहून ही वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली आहे.

रायगड रस्त्यावरच्या काचले, नाते, पाचाड अशा गावांतल्या गावकऱ्यांचाही इथली झाडं तोडण्याला विरोध आहे. काचले गावातले डॉ. संजीव गोखले यांच्या मते, रायगडला येण्यासाठी आणखी एक चांगला पर्यायी रस्ता आहे. माणगावहून किल्ले रायगडाकडे येणारा रस्ता एकही झाड न तोडता रुंद करण्यात येतोय. हा पर्याय असताना इथली वृक्षतोड कशासाठी, हा त्यांचा प्रश्न आहे.

(हेही वाचा : 'नाणार'वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे)

गावकऱ्यांचा जागर

सरकार एकीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतंय आणि दुसरीकडे ही गरज नसताना ही झाडं तोडली जातायत, असा मुद्दा नाते गावचे सरपंच अशोक खातू उपस्थित करतात. या वृक्षतोडीला त्यांचा थेट विरोध आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते...

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष  संभाजीराजे छत्रपती यांना 'न्यूज 18 लोकमत'ने या वृक्षतोडीबद्दल विचारलं. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणात जास्तीत जास्त झाडं वाचतील, अशी काळजी घ्यायला हवी, असं ते म्हणतात. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावकऱ्यांनी वृक्षतोडीच्या विरोधात रायगडाला जाग आणलीय. आता राज्य सरकार, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि रायगड प्राधिकरण यांनी समन्वयाने या वृक्षतोडीवर तोडगा काढण्याची गरज आहे.

===============================================================================================

First published: February 20, 2020, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या