पुण्यात राहुल गांधींची सभा ठरली, प्रचारही सुरू झाला, अद्याप काँग्रेसच्या उमेदवाराचा मात्र पत्ताच नाही

राहुल गांधींची सभा चार दिवसांवर आली तरीही अद्याप उमेदवारीचा घोळ संपलेला नाही, अशी परिस्थिती आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 08:10 PM IST

पुण्यात राहुल गांधींची सभा ठरली, प्रचारही सुरू झाला, अद्याप काँग्रेसच्या उमेदवाराचा मात्र पत्ताच नाही

पुणे, 1 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या शुक्रवारी (5 एप्रिल)पुण्यात प्रचारसभा घेणार आहेत, पण अद्याप पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण उमेदवार असेल याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. राहुल गांधींची सभा चार दिवसांवर आली तरीही अद्याप उमेदवारीचा घोळ संपलेला नाही, अशी परिस्थिती आहे.

पुणे मतदार संघात भाजपने गेल्या वेळी निवडून आलेले खासदार अनिल शिरोळ यांच्याऐवजी आमदार गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. युतीचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले, तरी काँग्रेसचा उमेदवार अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नाही.मोहन जोशींपासून सुरेखा पुणेकर पर्यंत अनेक नावांची चर्चा झाली, पण काँग्रेसकडून अद्याप कुठल्याच नावाची घोषणा झालेली नाही.

दरम्यान राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा मात्र झालेली आहे. त्यात ते 5 मार्चला पुण्यात सभा घेणार असल्याचं स्पष्ट आहे. राहुल यांच्या महाराष्ट्रात त्या दिवशी 2 सभा होतील. पहिली वर्ध्यात आणि दुसरी पुण्यात. पुण्यात ते कुठल्या उमेदवाराचा प्रचार करणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. 23 एप्रिलसाठी होणाऱ्या मतदानासाठी अर्ज भरण्याची अंतीम मुदत 4 एप्रिल आहे. त्यामुळे राहुल यांच्या सभेआधी नक्कीच पुण्याचा उमेदवार ठरलेला असेल. शेवटच्या क्षणी कुणाला तिकीट मिळणार याबाबत आता उत्सुकता आहे.

पुण्यात चर्चेत असणाऱ्या उमेदवारांच्या नावांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर आहे. ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अरविंद शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. पुणे काँग्रेसचे मोहन जोशी यांची वर्णी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचंही नाव मध्यंतरी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून चर्चेत होतं.  या सगळ्यांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


Loading...

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...