मुंबई, 6 जून : काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चित झाला आहे. विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांबाबत आता विखे पाटील यांना काय वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. याबाबत आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवरील आरोपाचा विषय आता संपला,' असं म्हणत विखे पाटील यांनी सपशेल माघार घेतली आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी आधी केलेले आरोप निराधार होते की आता भाजप प्रवेशासाठी त्यांनी माघार घेतली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशापूर्वी राधाकृष्ण विखे – पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसचे आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह ही खलबतं सुरू आहेत. भाजप प्रवेश करण्यापूर्वी विखे – पाटील काही काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधत आहेत. शिवाय, राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यासह किती आमदार भाजप भाजप प्रवेश करणार? हे देखील पाहावं लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी नाराज असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आघाडीचा प्रचार करणं देखील टाळलं होतं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण, लवकरच राधाकृष्ण विखे – पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
VIDEO: किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांसह 10 जण जखमी