अहमदनगर, 7 जून : काँग्रेसमधील नाराज नेते आणि सध्या भाजपच्या वाटेवर असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला आता खुलं आव्हान दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागांवर युतीला विजय मिळवून देऊ, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला आहे.
राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश उरला आहे. त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळात कोणतं खातं मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विखे यांचे आवडते कृषी खाते त्यांना दिले जाणार की वाढीव एफएसआय प्रकरणात अडचणीत आलेल्या प्रकाश मेहता यांचे गृहनिर्माण खाते बहाल होणार, यावर अंदाज बांधले जात आहेत.
दरम्यान, राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगत सावध भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत घुसमट झाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा युतीने जिंकल्याचे समाधान असल्याचे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीत याच यशाची पुनरावृत्ती करू, असं विखेंनी म्हटलं आहे.
थोरांवर हल्लाबोल
निळवंडे कालवे प्रश्नावर संगमनेर-अकोल्यातील प्रस्थापित या प्रश्नावर पंचवीस वर्षांपासून केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत विखे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत त्याप्रमाणे काम करावे असे सांगत थोरात आणि पिचड यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखेंनी केला आहे.
SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून मेहतांनी पाडला 'प्रकाश'!