Home /News /maharashtra /

सावधान! मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसींचा सुळसुळाट, नागरिकांना लाखोंचा भुर्दंड

सावधान! मुंबईपाठोपाठ ठाण्यातही बोगस लसींचा सुळसुळाट, नागरिकांना लाखोंचा भुर्दंड

मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाल्याचं चित्र आहे. नुकताच एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना लाखोंचा भुर्दंड पडल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे, 25 जून : मुंबईपाठोपाठ ठाण्यातही (Thane) बोगस लसीकरण (Bogus Vaccination) झाले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात (Naupada Police) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने 116 जणांना बोगस लस टोचून एक लाख 16 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केली असल्याचे समोर आले आहे. त्यातील चार जणांना बनावट प्रमाणपत्रेही (Bogus Certificates) देण्यात आली आहेत. मुंबईत बोगस लसीकरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचे चौकशीत समोर आले होते. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे साथीदार श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम या टोळीने 26 मे 2021 रोजी लसीकरण केल्याची माहिती मिळाली. श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी भेसळयुक्त आणि बनावट डोस देत ते कोव्हिशिल्डचे डोस असल्याचं सांगितलं. यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये उकळण्यात आले. एकूण 116 जणांच्या लसीकरणासाठी एक लाख 16 हजार रुपये वसुल करण्यात आले. विशेष म्हणजे त्यातील चार जणांना कोव्हिशिल्ड लशीचे बनावट प्रमाणपत्रही यावेळी देण्यात आले. मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर फसवणूक झालेल्या ‘रेन्युबाय डॉट कॉम’ या कंपनीचे क्लस्टर सेल मॅनेजर अर्णव दत्ता यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून सध्या हे सर्व आरोपी मुंबईत अटकेत असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली. हे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू, सर्वाधिक बिहारमध्ये बोगस लसीकरणापासून राहा सावध  सध्या अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करून बोगस लसीकरण करण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांनी अशा लसीकरणासाठी पैसे देण्यापूर्वी त्या गोष्टीची खातरजमा करणं गरजेचं आहे. लसीकरण करून घेण्यापूर्वी ती लस कुठल्या हॉस्पिटलमार्फत देण्यात येत आहे, याची विचारणा करावी. त्यानंतर त्या हॉस्पिटलच्या अधिकृत नंबरवर फोन करून किंवा अधिकृत इमेलवर याबाबत विचारणा करावी. त्याची खात्री पटल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नयेत आणि कुणाकडूनही लसीकरण करून घेऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
Published by:desk news
First published:

Tags: Coronavirus, Thane (City/Town/Village), Vaccination

पुढील बातम्या