पुणे, 15 जानेवारी: शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली याठिकाणी फिरायला गेलेल्या एका महिला ग्रुपसोबत एक अनपेक्षित घटना घडली आहे. संबंधित महिला ज्या बसने पर्यटनासाठी गेल्या होत्या, त्या बसच्या चालकाला अचानक फिट आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशात घाबरलेल्या महिलांना वाघोली येथील रहिवासी असणाऱ्या योगिता सातव यांनी धीर दिला. त्यांनी चालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वत: बस चालवली आहे. त्यामुळे चालकाला वेळेत उपचार मिळू शकला, तसेच पर्यटनासाठी आलेल्या सर्व महिला सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकल्या आहेत.
योगिता यांचा बस चालवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून अनेक स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे. वाघोली गावच्या माजी संरपच जयश्री सातव यांनी आपल्या सहकारी महिलांसोबत योगिता सातव यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार आणि कौतुक केलं आहे. यावेळी जयश्री सातव म्हणाल्या की, "चार चाकी वाहने बहुतेक महिला चालवतात. परंतु परिस्थिती गंभीर असताना बस चालवणारी तू वाघोलीतील पहिली महिला आहेस. याबद्दल आम्हाला तुझा अभिमान वाटतो."
हेही वाचा-पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा तुंबळ हाणामारी, टोळक्यानं लोखंडी सळईने केले वार
नेमकी घटना काय आहे?
पुण्याजवळील वाघोली येथील रहिवासी असणाऱ्या आशा वाघमारे आणि त्यांच्या काही मैत्रिणी शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे फिरायला गेल्या होत्या. यावेळी अचानक ड्रायव्हरला फीट आली आणि ते खाली पडले. त्यांचे डोळे पांढरे झाले. ते हात पाय वाकडे करू लागले. हे दृश्य पाहून बसमधील सर्व महिला घाबरल्या. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे कुणाला काहीच सुचेनासं झालं. अशा परिस्थितीत संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या योगिता धर्मेंद्र सातव यांनी बसचं स्टिअरिंग आपल्या हाती घेतलं. त्यांनी स्वत: बस ड्रायव्हींग करत सर्व महिलांना सुखरूप आपल्या घरी पोहोचवलं आहे.
महिलांना पर्यटनासाठी घेऊन गेलेल्या बस चालकाला अचानक फिट आल्याने वाघोलीतील योगिता सातव यांनी बस स्वत: चालवत चालकाचा जीव वाचवला आहे. pic.twitter.com/rStcy9KF7s
— News18Lokmat (@News18lokmat) January 15, 2022
योगिता यांच्या या अनोख्या कामगिरीमुळे बसमधील सर्व महिलांनी यांचे आभार मानले. संकटकाळात प्रसंगावधान दाखवत योगिता यांनी महिलांना आधार दिल्याने आणि वेळेत चालकाला रुग्णालयापर्यंत पोहोचवल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune